कासा : मुख्यमंत्र्यांच्या येथील सभेला अपेक्षित गर्दी जमविणे भाजपाला जमले नाही. त्यामुळे रणरणत्या उन्हात जे कुणी सभेसाठी आले होते त्यांना ताटकळत बसावे लागले. गर्दीसाठी मुख्यमंत्र्यांना थांबावे लागले असे होऊ नये यासाठी मग मुख्यमंत्री महालक्ष्मीच्या दर्शनाला आधी जाणार व नंतर सभेला येणार अशी फेररचना झाली. तसे दूरध्वनी आणि मेसेज तहसीलदारांनी पत्रकारांना पाठविले.तरीही गर्दी जमेना, मग खुर्च्यात गॅप मारा रे, असेल तर वाढवा रे असा उपाय योजला गेला. वास्तविक मुख्यमंत्री आल्यावर इतर वक्त्यांची भाषणे तत्काळ थांबविली जातात आणि मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होते. परंतु गर्दी जमेपर्यंत टाईमपास करायचा असल्यामुळे मुख्यमंत्री आले तरी भाषणे इतरांनी सुरूच ठेवली. मुळात सभेची वेळच चुकली होती. रणरणत्या उन्हात सभा ठेवण्यापेक्षा ती संध्याकाळी किंवा सकाळी लवकर ठेवायला हवी होती. असे उपस्थितांचे मत होते. परंतु श्रेष्ठींनी परस्पर सभेची वेळ ठरविली व पायावर धोंडा पाडून घेतला. अशी चर्चा सभास्थानी सुरू होती. सुटीच्या काळात शिक्षक, कामगार, परप्रांतीय बाहेरगावी जातात. त्यामुळे भाडोत्री जमविणेही अवघड असते. हे लक्षात घेऊन माणसे जमविण्याचे टार्गेट दिले असते तर सभा अधिक यशस्वी झाली असती असाही सूर व्यक्त होते होता. व्यासपीठावर सवरा विराजमान असले तरी त्यांचा चेहरा मात्र पडलेला होता. आपला कट्टर राजकीय विरोधक आपल्याच पक्षाचा उमेदवार होऊन आपल्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे. हे पाहण्याचे दुर्भाग्य त्यांच्या भाळी आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी दाखविण्यासाठी खुर्च्यांत गॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:31 AM