कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी नाका उड्डाणपुलावर गॅसवाहू टॅँकरला आग लागल्याने चालकाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या या अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अडीच तास वाहतूक कोलमडली होती.सायंकाळी चारच्या सुमारास भरुच (गुजरात) येथून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने तो उलटला. त्यावेळी गॅसची गळती झाल्याने गाडीने पेट घेतला. यात चालक अवध बिहारी याचा होरपळून मृत्यू झाला.या सिलेंडरमध्ये हायड्रोजन गॅस असल्याने आग झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे उड्डाण पुलाखाली प्रवाशी वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या पेटल्या. परंतु यामध्ये जीवित हानी झाली नाही. दोन तासांनी डहाणू येथून अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे महामार्गवर ३ ते ४ किमी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाय टँकरमधील काही सिलेंडर पुलावरून खाली पडल्याने सर्व्हिस रोडची वाहतुकही खोळंबली होती.चार जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅस टॅँकर पेटला; चालकाचा गाडीत होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:52 AM