- शशी करपे, वसईगौरी-गपणतीचे आगमन अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपले असताना महापालिका आणि पोलीस प्रशासनाचीही जय्यत तयारी झाली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा तयार झाली आहे. यंदा वसई तालुक्यात तब्बल २५ हजार ९७६ गणरायांचे आगमन होत असून त्यात सार्वजनिक ८१८ आणि घरगुती गणरायांची संख्या २४ हजार १६० इतकी आहे. तर ३ हजार १८ गौरींचे आगमन होणार असून त्यात घरगुती ५५ आणि सार्वजनिक गौरींची संख्या २ हजार ९६३ इतकी आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा गौरी-गणपतींच्या संख्या वाढ झालेली आहे. गेल्यावर्षी गणरायांची संख्या २३ हजार २६० होती. त्यात २ हजार ७१६ ची भर पडली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणरायांची सर्वाधिक संख्या आहे. याठिकाणी सहा हजार घरगुती आणि १८१ सार्वजनिक गणराय विराजमान होणार आहेत. त्याखालोखाल तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपतींची संख्या आहे. याठिकाणी घरगुती गणेशाची संख्या ५ हजार ८०० आणि सार्वजनिक २३१ इतकी आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती ४ हजार २५ आणि सार्वजनिक १६१ गणपती आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ८९ आणि घरगुती २ हजार ६५० गणपती आहेत. वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती २ हजार ५० आणि सार्वजनिक गणपतींची संख्या ४५ आहे. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गणपतींची संख्या १ हजार ९०० तर सार्वजनिक गणपती ४९ आहेत. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गणपतींची संख्या १ हजार ७३५ असून सार्वजनिक गणपतींची संख्या ६२ आहे. तालुक्यात दीड दिवसांचे घरगुती ९ हजार ३४० गणपती असून सार्वजनिक ६९ गणपती आहेत. पाच दिवसांचे घरगुती ३ हजार ९६७ असून सार्वजनिक १५९ आहेत. सहा दिवसांचे घरगुती गणपती ४ हजार १७३ तर सार्वजनिक १२४ आहेत. सात दिवसांचे घरगुती गणपती ३ हजार ३४३ असून सार्वजनिक २०८ आहेत. आठ दिवसांचा एक सार्वजनिक गणपती वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. ११ दिवसांचे घरगुती ३ हजार ७३६ आणि सार्वजनिक गणपती २८५ आहेत. ९६ ठिकाणी विसर्जनाची तयारी : विसर्जनासाठी वसई विरार पालिकेचेही तयारी पूर्ण झाली आहे. यंदा कृत्रिम तलावत विसर्जनाचा प्रयोग फसल्याने पालिकेने ९६ ठिकाणी विसर्जनाची तयारी केली आहे. प्रत्येक ठिकाणी मंडप, तराफे आणि लाइफ जॅकेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पट्टीचे पोहणारे कार्यकर्ते तयार करण्यात आले आहेत. तालुक्यात एकूण ८४ तलावांसह समुद्रकिनारी १२ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गौरी-गणपतीसाठी वसई, विरारमध्ये प्रशासन सज्ज
By admin | Published: September 04, 2016 3:21 AM