- हितेंन नाईकपालघर : पानेरी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत रासायनिक कारखाने, रहिवासी संकुले ह्यांना नियंत्रणाखाली आणून राजकीय पक्षांच्या मध्यस्तीला लगाम लावण्याचे काम ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून महिमकरांनी साध्य केले आहे. ह्या ठरावामुळे ग्रामपंचायतीच्या आडून आपले इप्सित साध्य करणाऱ्या टोळक्यांना लगाम बसून पानेरीचे गतवैभव प्राप्त करण्याच्या मोहिमेला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.पानेरी नदीचे पाणी नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी आणि परिसरातील औद्योगिक वसाहती मधील कारखान्यातून सोडल्या जाणाºया रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाले असून त्याविरोधात माहिमचे ग्रामस्थ अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र ह्या लढ्याची प्रशासनाकडून परिणामकारक दखल घेतली जात नसल्याने आपली पाणेरी वाचविण्या सोबत परिसरातील प्रदूषण थांबवायचे असेल तर बाहेरून कोणी येऊन आपली मदत करेल ही अपेक्षा दूर सारून सर्व ग्रामस्थानांच आपापसातील सर्वप्रकारचे भेदाभेद टाळून एकत्र येणे अत्यावश्यक असल्याचे सत्य त्यांच्या लक्षात आले आहे. यासाठी लोकशाही व्यवस्थेतील सर्वात सक्षम अशा ग्रामसभेच्या व्यासपीठाचा वापर करून प्रदूषणाविरुद्ध एकमताने निर्णय घ्यावा लागेल हे उमगल्यावर माहीम ग्रामपंचायत कार्यालयात ५ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी संकुले उभारतांना पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणची व्यवस्था तसेच शोषखड्डाची पूर्तता केल्याशिवाय ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला देऊ नये, पानेरी नदीला कायदेशीर स्थान असल्याने नदीच्या प्रवाहात कोणत्याही मार्गाने येणारे पाणी बांध घालून थांबविण्यात यावे तसेच बांध फोडणाºयावर कायदेशीर कारवाई करावी, पानेरी नदी प्रदूषित करणाºयापालघर नगरपरिषद आणि कारखान्यांसह अन्य व्यक्तिविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि कारखान्याचा नाहरकत दाखला रद्द करण्यात यावा, नदी पात्राच्या उच्चतम पूर रेषेपासून १०० मीटर्स च्या परिसरात नवीन कारखाने आणि रहिवासी संकुलाना ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्याशिवाय नाहरकत दाखला देऊ नये, कारखान्या मधील सर्व कूपनलिका बंद करून त्यांना ग्रामपंचायती कडून पाणीपुरवठा करण्यात यावा, नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सूर्या नदीचे पाणी सोडण्याबाबत ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, गावपातळीवर जलसेवक नेमावेत असे ठराव घेण्यात आले.
पानेरी प्रदूषणमुक्तीचा ठराव ग्रामसभेत मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:39 PM