पालघर/कासा : गडचिंचलेमध्ये पोलिसांसमोर तीन लोकांवर जमावाने हल्ला केला असताना पोलिसांनी गोळीबार का केला नाही? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाचा सूत्रधार अजूनही पकडला जात नसल्याने याचा तपास फास्ट ट्रॅकवर घ्या. या क्रूर हत्याकांडाचा उलगडा लवकरात लवकर व्हावा यासाठी तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.डहाणू तालुक्यातील गडचिंचलेमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. मनीषा चौधरी, आ. सुनील राणे यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर पालघरच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणाऱ्या या घटनेला २५ दिवसांचा कालावधी लोटूनही आज अनेक प्रश्न अनुत्तरित असून हा हल्ला चिथावणीतून झाल्याने या हल्ल्यामागचा सूत्रधार शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याची टीका दरेकर यांनी केली.गडचिंचले हे पोलीस मुख्यालयापासून तासाभराच्या अंतरावर असताना घटनास्थळी पोचण्यास पोलिसांना पाच तासाचा कालावधी का लागतो? असा प्रश्न उपस्थित करून जमावाने पोलिसांना मारहाण केली ही बाब त्यांनी आपल्या मुख्यालयाला का कळवली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या हत्याकांडाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेत तो सीआयडीकडे सोपविण्यात आला असला तरी एक पोलीस आपल्या दुसºया पोलीस बांधवांचा तपास करताना तो निष्पक्षपणे कसा होऊ शकतो? असाही प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला आहे. पोलीस प्रशासनाबरोबरच जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवरही शंका उपस्थित करीत या प्रकरणी झालेल्या कुचराईची चौकशी झाली पाहिजे, यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला गेला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी तपास फास्ट ट्रॅकवर करण्यात यावा, यासाठी आ. दरेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आणि तहसीलदार सुनील शिंदे यांना निवेदन दिले.दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत ज्येष्ठांना तिकीट वाटपात डावलण्यात आल्याने पक्षात धुसफूस असल्याबाबत विचारणा केली असता कोणाला डावलण्याचा प्रश्न नसून वेगवेगळ्या समाजघटकांना, तरुणांना पक्षात प्रतिनिधित्व देऊन सर्वसमावेशक अशी भूमिका पक्षाने घेतली असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी दरेकर यांनी अनेक कार्यकर्र्त्याशी चर्चा करून येथील परिस्थिती जाणून घेतली.
गडचिंचले तपास फास्ट ट्रॅकवर घ्या! विरोधी पक्षनेत्यांचा मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 6:12 AM