हुसेन मेमनजव्हार : तालुक्यातील घिवंडा ते खोरीपाडा रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे गत सहा महिन्यांपासून एसटीने या भागाकडे पाठ फिरवली आहे. हा भाग आदिवसी व दुर्गम असल्याने गावकरी, शाळकरी व रुग्ण यांना प्रवास करतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा परीणाम थेट रोजगार, शिक्षण व आरोग्यावर होत असल्याने या कडे जि.प. व एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.घिवंडा खोरीपाडा परिसरात पिंपळपाडा, शिवाचापाडा, बोडारपाडा, घिवंडा गावठाण, पागीपाडा, कारभारीपाडा आहेत. दरम्यान, रस्ता उखडल्याने एसटी महामंडळाने जून महिन्यापासून घिवंडा व खोरीपाडा पर्यंत येणारी एसटी बंद करून आता ती पिंपळपाडयापर्यंत सुरु ठेवली आहे.या निर्णयामुळे घिवंडा व खोरीपाडा येथील नागरीक, विद्यार्थी व रु ग्णांचे हाल सुरु आहेत. या सर्वांना कुठही जायचे असल्यास पिंपळपाडया पर्यंत पायी चालावे लागत आहे. हा प्रवास जंगलातील पाय वाटेने केला तर ५ कि.मी. आणि रस्त्याने गेले तर १२ कि.मी. असा आहे. पिंपळपाडा ते पागीपाडया पासून काही किलोमीटरवर असणाºया घिवंडा खोरीपाडा या रस्त्याची दुरावस्था झाली असून, रस्त्यावरील खडी उखडून गेल्याने वाहने चालविणे तर दूरच, पायी चालणेही कठीण झाले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले यांचा हा मतदार संघ असून तो त्यांच्या गावाला लागून आहे. असे असतांनाही त्या परिसरांकडे पहायला इतरांना सोडा थेतले यांनाही अद्याप वेळ मिळाला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होते आहे.>स्थानिकांनी केले दोन दिवस श्रमदानघिवंडा घोरीपाडा एसटी चालू व्हावी आणि गैरसोय दूरव्हावी म्हणून रस्त्याची सुधारणा करण्यासाठी शासनाची वाट न पहाता या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन दोन दिवस श्रमदान केले आहे. पागीपाडा ते खोरीपाडा अशा १२ कि.मी.च्या संपूर्ण रस्त्यावर दगड, माती टाकून नागरिकांनी श्रमदान केले आहे. परंतु तरीही रस्त्याची दुरावस्था कायम आहे.
घिवंडा-खोरीपाडा एसटी ६ महिने बंद, नागरिक, विद्यार्थी व रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:08 AM