मीरारोड - मुसळधार पावसा मुळे घोडबंदर मार्ग व राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरात सुद्धा अनेक दाखल भागात पाणी तुंबले.
घोडबंदर मार्गवरील काजूपाडा व चेणे दरम्यान तसेच फाउंटन ते जुन्या टोल नाका दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन गायमुख पर्यंत वाहनांची रांग लागली होती. तर वसईच्या भागातील महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोलमडून पडली. नवीन उड्डाण पूल व खालच्या जुन्या उड्डाण पूल पासून दिल्ली दरबार हॉटेल पर्यंत वाहनांची रांग लागली होती. यामुळे वाहन चालक आणि प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले.
वाहतूक पोलीस निरीक्षक देविदास हांडोरे, सहायक निरीक्षक माणिक कथुरे सह वाहतूक पोलिसांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने माती भरून बंद झालेले मार्ग खुले केले. तसेच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने पोलिसांनी त्यात पेव्हर ब्लॉक चे तुकडे भरायला लावले.
शहरात देखील मुसळधार पावसा मुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. पावसाचा जोर कमी झाल्या नंतर पाणी ओसरले. तर २१ जुलैच्या सकाळी १० ते २२ जुलै सकाळी १० वाजे पर्यंत शहरात १५३ मिमी इतका पाऊस पडला आहे. तर दुपारी सव्वातीन च्या सुमारास ३. ९ मीटर उंचीची भरती होती अशी माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.