वसंत भोईर।लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : पुरोगामी महाराष्ट्रात आजही भगत, मांत्रिकांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली दिसत नाही. याचेच प्रत्यंतर वाडा तालुक्यातील केळठण या सुशिक्षित समजल्या जाणा-या गावामध्ये आला आहे. गावांमधील महिला पोलिस पाटील नम्रता पाटील यांनीच गावदेवीची ‘बांधणी’ केली असून त्यामुळे गावातील लोकांना त्रास होत असल्याचे भाकीत तथाकथित भगतांने केल्याच्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण तालुक्यात तो चर्चेचा विषय झाला आहे. या अंधश्रद्धेच्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.या प्रकरणी यशवंत पाटील (वय ५५) व विशाल पाटील वय २० अशी आरोपींची नावे असून अजूनही या प्रकरणात वीस किंवा त्याहून अधिक आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील केळठण या गावामधील रहिवाशी यशवंत पाटील यांच्या कुटुंबाला सतत कसला ना कसला त्रास होत असल्याने त्यांना आपल्यावर कुलदैवतांचा कोप झाल्याचा संशय होता. आपले देव कुणीतरी बांधलेत या शंकेने त्यांना पछाडले. देवांची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी गावामध्ये कुलदैवतांचा गोंधळ मंगळवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी त्यांनी बाहेरगावाहून सात भगतांना बोलावले होते. रात्री उशिरा २ वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. त्यावेळी याच गावातील विशाल पाटील या तरुणाने अंगात देव आला आहे, असे भासवून घुमायला सुरु वात केली. त्याने घुमता - घुमता, आपल्या गावदेवीची बांधणी पोलीस पाटील बाईने केली आहे.
त्यामुळे सगळ्याच गावाला त्रास होत आहे. या बाईने गावदेवीच्या मंदिरात दोन नारळ व त्यावर हिरवा कपडा टाकून ‘करणी’ केली आहे, असे सांगितले. त्यामुळे ही पोलीस पाटील बाईने अपशकुनी आहे व तिनेच हे सारे कृत्य केल्याची चर्चा त्यावेळी घडवून आणली. ही बातमी पसरताच पोलीस पाटील नम्रता पाटील यांची बदनामी झाली. त्यामुळे त्यांनी तत्काळ वाडा पोलिस ठाण्यामध्ये तक्र ार केली. वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे तपास करीत आहेत.