- आशिष राणे वसई - पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला सुंदर व नयनरम्य समुद्रकिनारे लाभले आहेत त्यापैकीच एक अशा वसई गावांतील होळी- बेणापट्टी समुद्रकिनारी मंगळवार दि 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत भरतीच्या पाण्यासोबत वाहत आला आहे.हा महाकाय व्हेल मासा सुमारे 40 ते 50 फूट लांबीचा व 10 टन वजनी असून त्याची एकूणच अवस्था पाहता तो सुमारे 15 ते 20 दिवसापूर्वीच त्याचा भर समुद्रात एखाद्या मोठया बोटीच्या धडकेने अथवा समुद्रातील सुरूंग स्फोटाने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वाटतो आहे.त्यामुळे मंगळवारी अचानकपणे भरतीच्या पाण्यासोबत समुद्रलाटांनी दूरवरून तो वसईच्या होळी बेणापट्टी समुद्रकिनारी फेकला गेला आहे.
दरम्यान बऱ्याच माहिन्यांनी वसई समुद्रकिनारी असा महाकाय व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर या महाकाय व्हेल माशाला पाहण्यासाठी वसईकर स्थानिक ग्रामस्थांनी व पर्यटकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती
या व्हेल माश्याची माहिती स्थानिक रहिवासी वेलकनीं डिसोझा व पायस अंकल यांनी लागलीच वसई पोलीस, वसई विरार महापालिका प्रशासन व मत्स्य विभागाला देत सहकार्य केले. त्यामुळे आता मत्स्य व इतर यंत्रणाच्या सहकाऱ्यांने पुढे या माशाची याच समुद्रकिनारी विल्हेवाट लावली जाईल असे ही समजते.अर्थातच येथील बेणापट्टी समुद्रकिनाऱ्यावर या माशाची लागलीच व्हिलेवाट लावणे गरजेचे आहे किंबहुना या माशाचा पाण्यात खूप दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याने व मासा पाण्याबाहेर आल्याने आता त्याची सर्वत्र हळूहळू दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.