बोर्डी : आई-बाबा पाहिलंत का, मी तुमच्याकरिता शाळेतून भेटवस्तू आणलीय, हे शब्द ऐकून पालकही भारावून जातात. होय असे घडलंय घोलवड गावात. टोकेपाड्याच्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्र मातून.येथे १ ली ते ४ थी पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेच्या निकालपत्रासह भेटवस्तू देऊन पालकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे जमा करून त्यांना निकालपत्रासह त्या पैशातून भेटवस्तू द्यायची अशी संकल्पना दीपक देसले आणि सुनीता गुळवे या शिक्षकांनी विद्यर्ा्थ्यांच्या पुढे मांडली, त्याला थोड्याच दिवसात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे या शिक्षकांनी सांगितले. हे विद्यार्थी रोज आपल्याकडील १ रु पयांपासून ते दहा रु पयांपर्यंत पैसे जमा करीत, त्याच्या वर्गानुसार नोंदी ठेवल्या जात होत्या. हा उपक्र म शिवजयंतीपासून सुरु केला. या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांना आई-वडिलांना दैनंदिन जीवनात आवश्यक गृहोपयोगी वस्तूंची यादी बनविण्यास सांगितली. त्याचा अभ्यास करून बादली, सांडशी, झाडू, डस्टबीन अशा नानाविविध वस्तूंपैकी एक द्यायचे ठरविण्यात आले. या करिता ३ मे रोजी विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या निकालपत्रासह एक भेटवस्तू आणि अर्धा डझन केळी देण्यात आली. पाल्यांनी खाऊच्या पैशातून भेटवस्तू दिल्याने पालकांना आश्चर्यासह हेवा तर वाटलाच, शिवाय त्यांचे डोळेही पाणावल्याची प्रतिक्रिया पालकांनी शिक्षकांना कळवून त्यांचे आभार मानले.दरम्यान शैक्षणिक ज्ञानासह बचत, जीवन जगण्यासाठी निरीक्षण व निर्णयक्षमता आणि श्रमप्रतिष्ठेचे धडे मिळावेत या करिता हा उपक्र म राबविला. विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तो पूर्णत्वास आल्याचे कौतुकोदगार या दोन शिक्षकी शाळेतील प्रमुख शिक्षक दीपक देसले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बचतीच्या पैशांतून दिले पालकांना गिफ्टे , घोलवडच्या जि. प. शाळेतील नवोपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 6:47 AM