वसई : महापालिका परीवहनच्या धावत्या बसमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या मच्छिमार महिलेच्या वारसांना १९ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने परिवहनचा ठेकेदार आणि इन्शुअरन्स कंपनीला दिले आहेत. या लढाईला चार वर्षांनी यश मिळाले. पाचूबंदर येथे राहणाऱ्या फिलोमीना व्हॅलेंटाईन सजन (५४) या मासळी विक्रेत्या १८ डिसेंबर २०१३ रोजी पाचूबंदर येथून पापडी येथे जाण्यासाठी परिवहनच्या बसने निघाल्या होत्या. चालक बस सुसाट वेगाने चालवत होता. प्रवाशांनी सांगूनही तो बेदरकारपणे बस चालवीत होता. वसई एसटी बस डेपोलगतच्या वळणावर अचानक ब्रेक दाबल्याने दरवाजा नजिकच्या सीटजवळ उभ्या असलेल्या फिलोमीना बसमधून बाहेर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या. ४९ दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर त्यांचे ६ फेब्रुवारी २०१४ ला हॉस्पीटलमध्ये निधन झाले होते. त्यांच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले होते. म्हणून तत्कालीन नगरसेवक संजय कोळी यांनी यप्रकरणी फिलोमीना यांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. तसेच महासभेतही आवाज उठवला होता. मात्र, ठेकेदार आणि महापालिकेने त्याची दखल घेतली नव्हती. त्यानंतर कोळी यांनी साधना राऊत आणि कोळी युवा शक्तीचे अध्यक्ष दिलीप माठक यांच्या मदतीने याबाबत मोटार अपघात लवादाकडे दाद मागितली होती. तिच्या सुनावणी अंती हा निर्णय लवादाने दिला. (प्रतिनिधी)
महिलेच्या वारसांना द्या १९ लाख!
By admin | Published: February 18, 2017 6:23 AM