- लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. जर तुम्हाला खरोखरच शेतकऱ्यांबाबत सहानुभूती असेल तर कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजिनामे देऊन सत्तेतून बाहेर पडा. तरच तुम्ही शिवसेनेचे वाघ ठराल. दुटप्पी भूमिका घेऊ नका, अशी खरमरीत टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी डहाणू येथे संवाद यात्रे दरम्यान केली.राज्यात समाजातील वकील, शिक्षक, सैनिक, महिला हे सर्व घटक दु:खी आहेत. तर मग सुखी कोण आहे? दोनच व्यक्ती आनंदी आहेत. एक नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शहा. अधिकार आणि दिवे काढून घेतले म्हणून सरकारमधील मंत्री दुखी आहेत. तर या देशातला कोणता घटक सुखी आहे? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार आनंद ठाकूर, महिला आघाडाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष सुनिल भूसारा, निरीक्षक वडावकर, जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर, तालुका अध्यक्ष राजू पारेख, शमी पिरा, अनिल गावंड यासह जिल्हातील पक्षाचे नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यात कुपोषण वाढते आहे. याला सरकारी धोरण जबाबदार आहे. अनेक योजना हे सरकार आल्यापासून बंद झाल्या आहेत. मिशन मोड बंद करण्यामागे सरकारचा काय विचार आहे. आदिवासी विभागाकडे निधी आहे. तो यासाठी का वापरत नाही. याचे उत्तर मिळत नाही. मी विष्णू सवरा असते तर राजीनामा दिला असता. ज्या जिल्हयातून आपण निवडून येता तिथलेच लोक अडवत असतील. तर त्या लोकांचा सत्तेत राहण्याचा काय उपयोग? अशी टीकाही यावेळी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बलात्काराच्या घटना वाढत आहेत. असे सांगून त्यांनी बुलढाण्यात घडलेल्या घटनेबाबत यावेळी शोक व्यक्त केला.