बोर्डी : साडेतीन पैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला नागरिकांनी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले. त्यामुळे बोर्डी व डहाणू शहरातील ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये गर्दी होती. नवीन वाहने, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करुन अनेकांनी गृह खरेदीही केली. डहाणू तालुक्यातील अनेक गावंमध्ये गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. तरुणाईने सोशल मीडियावर शुभेच्छांची देवाणघेवाण केली. डहाणू शहर आणि बोर्डी गावात शोभायात्रेचे आयोजन केले. बोर्डी गावात सोमवंशीय क्षत्रिय मित्रमंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळीच विजयस्तंभ येथून काढण्यात आलेली बाईक रॅली बोरीगावातील राधाकृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेली. सु.पे.ह हायस्कूलच्या पटांगणावरून ती निघाली व गजीताई हॉल येथे तिचे विसर्जन झाले. तिच्यात ८७ बाईकवर बसलेल्या १४८ युवक, युवती व महिलांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर उमा हरिभाऊ राऊत व हरिभाऊ यादव राऊत यांच्या हस्ते सार्वजनिक गुढी उभारण्यात आली. त्यांनी सणाविषयी माहिती सांगितली. या दिवशी कुलदैवतांचे आणि परिसरातील अन्य देवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली होती. नारळ, धने, गूळ आणि कडूलिंबाची कोवळी पाने घातलेला प्रसाद वाटण्याची परंपरा आजही दिसून आली.
सुवर्ण खरेदीने उभारली बोर्डीत गुंतवणुकीची गुढी
By admin | Published: March 29, 2017 4:52 AM