पालघर : ‘आम्ही सातपाटीकर’च्या माध्यमातून शुक्रवारी ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधाऱ्याची भगदाडे बुजविण्याचे काम हाती घेतल्यानंतर आज राज्य शासनाच्या पतन विभागाला जाग आली असून कार्यकारी अभियंता आर.डी. मिसाळ यांनी बंधाऱ्याला भेट दिली. या वेळी बंधाऱ्याला पडलेल्या भगदाडीमध्ये मोठ्या आकाराच्या दगडासह मातीच्या मोठमोठ्या पिशव्या रचून समुद्राच्या लाटा थोपविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.सातपाटीचा संरक्षक बंधारा नव्याने उभारून त्याची उंची वाढविण्याच्या दृष्टीने १७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनदरबारी असून त्यातील ५ कोटी रुपयांच्या पहिल्या निधीच्या प्रस्तावाला लवकरच (दिवाळीपर्यंत) मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे कळते. तर दुसऱ्या टप्प्यातील १० कोटींचा प्रस्तावही मान्यतेसाठी शासनाकडे असून सातपाटीतील लोकप्रतिनिधी, संस्था शासनस्तरावर पाठपुरावा करीत असल्याचे राजन मेहेर यांनी सांगितले. शनिवारी सकाळीच राज्य शासनाच्या पतन विभागाचे अभियंते मिसाळ, भाकरू, सहसरपंच मेहेर, मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, संतोष मेहेर, भुवनेश्वर मेहेर, अनिल चौधरी, विठोबा चौधरी, जयप्रकाश मेहेर, भगतसिंग पागधरे, मुकेश मेहेर इ.नी दुरवस्था झालेल्या भागाची पाहणी केली. या वेळी ५०० ते १०० किग्रा वजनाचे मोठे दगड, भगदाडे पडलेल्या ठिकाणी रचून ठेवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सातपाटीकरांच्या घरात पाणी शिरत असतानां कुठलीही मदत उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त झाला. (प्रतिनिधी) निधी प्राप्त झाल्यानंतर बंधाऱ्याचे कामहा सर्व निधी प्राप्त झाल्यानंतर ५०० ते ६०० मीटर लांब आणि सुमारे सात मीटर उंचीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे काम प्रथम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन ही संस्था काम करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.अतिक्रमणे ठरणार अडचणीची : हे काम सुरू करताना बंधाऱ्यालगत वाढणारी अतिक्रमणे ही मोठी अडचणीची ठरणार असून ही अतिक्रमणे रोखण्याची कामे प्रथम स्थानिक प्रशासनाला करावी लागतील. नाहीतर बंधारा उभारणीचे काम सुरू करणे कठीण होईल, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.राज्यकर्त्यांवर गावकऱ्यांमध्ये नाराजी- सातपाटीच्या संरक्षक बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्यानंतर समुद्राची आक्र मणे किनाऱ्यावरील घरावर होऊन त्यांचे संसार उद्ध्वस्थ होऊ लागली होती. अशा वेळी शासन, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ युद्धपातळीवरून मदतकार्य उपलब्ध होईल, अशी माफक अपेक्षा होती. - दिवसेंदिवस समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन किनाऱ्यावरील घरांना महाकाय लाटा धडका देत असल्याने मिळेल त्या वस्तूंचा आधार आपल्या घरांना देत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक कुटुंब दिवसरात्र झटत होते. शासनाकडून मदत न मिळाल्याने शेवटी गावकरी मैदानात उतरले.
श्रमदानाने आली शासनाला जाग
By admin | Published: July 10, 2016 12:28 AM