हितेन नाईक / पालघरजिल्ह्यातील कुपोषण, आरोग्याशी निगडीत अनेक योजना गाव पातळीवर राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांना शासन अल्प मानधनावर कंत्राटी पद्धतीने राबवित असून बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारही निकृष्ट दर्जाचा पुरविण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज श्रमजीवी संघटनेच्यावतीने सरकारच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जिल्हापरिषद पालघर समोर आयोजित करण्यात आला होता.पालघर जिल्हा निर्मितीला तीन वर्षे झाली तरी जिल्ह्यात कुपोषण, रोजगार, आरोग्याशी निगिडत अनेक प्रश्न आ वासून उभे असून ते सोडविण्यासाठी व शासनाच्या अनेक योजना, उपक्रम गावपातळीवर राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे अल्प मानधनही वेळेवर दिले जात नाही. मागील अनेक वर्षा पासून निषेध मोर्चे, आंदोलने करूनही त्यांच्या प्रश्नाकडे शासन गांभीर्याने पहात नाही. त्यातच अंगणवाड्या मधून ७ महिने ते ३ वर्षाच्या बालकांच्या पोषणासाठी पुरविण्यात येणाऱ्या सीलबंद टीएचआर पूरक आहार हा अत्यंत निकृष्ट आहे. त्याचा कुठलाही फायदा कुपोषितांना होत नाही. अनेक वर्षा पासून त्याला लाभार्थ्यांसह अंगणवाडी सेविकांचा प्रचंड विरोध असतांना केवळ ठेकेदारांकडून मिळणाऱ्या टक्केवारी मुळे तो बालकांच्या माथी मारला जात आहे. त्याच्या निषेधार्थ व अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांच्या मूलभूत मागण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव प्रमोद पवार, अनिता धांगडा, स्मिता घाटाळ यांच्यासह शेकडो महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेऊन सरकारचे निषेधात्मक डोहाळ जेवण केले ह्यावेळी अंगणवाड्यात पुरविला जाणारा टीएच आर पोषक आहार बंद करण्यात यावा, पोषण आहाराची रक्कम ग्राहक मूल्य निर्देशकांशी जोडून व आगाऊ द्यावी, आहाराची थकबाकी लवकर मिळावी, अमृत आहाराची रक्कम लवकर व आगाऊ मिळावी, अंगणवाड्याचे रजिस्टर्स मार्च महिन्यात मिळावेत, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, त्यांचे मानधन नियमित व महिन्याच्या १० तारखेला मिळावे, १० वर्ष सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, ड्रेसकोड साठी १ हजाराची रक्कम वर्षातून दोनदा मिळावी, या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद कार्यालयाला पोलीस छावणीचे रूप स्वरूप आले होते. पोलीस व कार्यकर्त्यामध्ये धक्काबुक्की सुरु झाली यादरम्यान निधी चौधरी या गाडीतच बसल्या होत्या त्यानंतर हा प्रक्षोभ वाढू नये या साठी त्या गाडीतून उतरल्या व पुन्हा कार्यर्त्यांसमवेत चर्चेस बसल्या. त्यामुळे वातावरण बरेचसे निवळले साडेचार तास हा घटनाक्रम सुरु होता. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठया प्रमाणात झाली होती. ती बऱ्याच वेळाने मोकळी झाली.
पालघरात सरकारचे डोहाळजेवण
By admin | Published: April 24, 2017 11:50 PM