जव्हार : येथील बाल संजीवन छावणी येथे रविवारी श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रमजीवी संघटना यांच्या विद्यमाने कुपोषित बालकांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जव्हार आणि विक्र मगड येथील तीव्र कुपोषित बालकांना तज्ज्ञांकडून तपासण्यात आले. सरकार अजूनही याबाबत गंभीर झालेले नसून असंवेदनशीलता कायम असल्याचा मत यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले.मोखाड्यातील बालमृत्यूमुळे कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर दौरे आणि घोषणा करण्यात सरकार कमी पडले नाही मात्र वर्ष उलटून देखील यातील एकही घोषणा आणि आश्वासन प्रत्यक्षात उतरले नाही. आजही या भागात कुपोषणाचे लक्षणिय प्रमाण असतांना सुद्धा सरकारकडून कोणतीही ठोस अशी उपाययोजना केली जात नाही. याबाबत श्रमजीवी संघटना नेहमीच आवाज उठवत आहे. याभागात कुपोषित बालकांची प्रमुख जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविकांना सप्टेंबर पासून मानधन आणि पोषक आहाराचे पैसे मिळालेले नाहीत, बचत गटांनी शिजवून दिलेल्या आहाराची बील त्यांना मिळलेले नाहीत. पालघर जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी आणि इतर अनेक रिक्त पदं असतांना देखील याकडे डोळझाक केली जात असल्याचे सांगून पंडित यांनी संताप व्यक्त केला. विठू माऊली ट्रस्ट आणि श्रमजीवी संघटना आपल्यापरीने कुपोषण निर्मूलनाचा लढा कायम ठेवणार असल्याचे पंडित यांनी सांगितले. या शिबिरासाठी मुंबईतील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. १०४ कुपोषित बालकांवर यावेळी उपचार करण्यात आले.डॉ.वर्षा भोसले, डॉ.विनोद बिराजदार, डॉ. लायका घरत हे बालरोग तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. यावेळी श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, प्रमोद पवार, कैलास तुंबडा, संतोष धिंडा, कमलाकर भोरे, जमशेद खान, वसंत वझे, स्नेहा घरत, आशा चौधरी, ममता परेड इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते. आरोग्य विभागाच्या कुर्झे आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.(वार्ताहर)
सरकारची असंवेदनशीलता अजूनही कायम!
By admin | Published: February 22, 2017 5:54 AM