वसई : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत तालुकास्तरावरील पंचायत समित्या उदासीन असल्यामुळे अनेक कर्मचारी विविध फायद्यापासून वंचित आहेत. शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सभा घेण्याचे बंधन असताना गटविकास अधिकारी अशा सभा घेत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. गेली अनेक वर्षे संघटना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर शासनस्तरावर तसेच न्यायालयीन लढे देत आहेत.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, उपदान निधी, शासकीय सेवेत सामावून घेणे इ. सुविधा देण्यासंदर्भात राज्यशासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अनेक प्रकरणात शासनाला माघार घ्यावी लागली असून काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य शासनाने काही वर्षापूर्वी परिपत्रक काढून सर्व पंचायत समित्यांना कर्मचाऱ्यांच्या बैठका लावण्याचे आदेश जारी केले होते. या परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन होत नाही. तर अनेक गटविकास अधिकारी या बैठका घेण्यास टाळाटाळ करीत असतात. (प्रतिनिधी)
ग्रा.पं. कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत
By admin | Published: July 28, 2015 11:32 PM