- सुनील घरत पारोळ - भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. यामुळे आजही मोठ्या जनजीवनाला यातनामय जीवन जगावे लागत आहे. याचा प्रत्यय विरार पश्चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे.या ठिकाणच्या ग्रामस्थांना समुद्रातून बोटीने प्रवास करून शहरात यावे लागते. संध्याकाळी ७ नंतर बोट बंद होत असल्याने किल्ल्याबाहेर पडताना नागरिकांना वेळेचे भान ठेवावे लागते. अन्यथा पूर्ण रात्र किनारपट्टीवर घालवण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. अर्नाळा किल्लावासीयांसाठी मागील ४ वर्षांपासून समुद्रीमार्गे जेट्टी (पूल) बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. धूपप्रतिबंधक बंधारा बांधून मंजूर होऊन काम सुरूदेखील करण्यात आले आहे. पण काम संथगतीने सुरू असल्याने पुढील वर्षीच्या पावसाळ्यात येथील आणखी २० ते २५ घरे समुद्र गिळंकृत करण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.माजी खासदार तथा माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी अर्नाळा किल्ला परिसरात असलेले काळोखाचे साम्राज्य पूर्णपणे नाहीसे करून विजेची सोय उपलब्ध करून दिली. त्याआधी बेरोजगारी आणि अज्ञानाच्या दरीत खितपत पडलेला अर्नाळा किल्ला परिसरातील तरुण वर्ग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक बाबतीत प्रगती करू लागला आहे. वसई तालुक्यात होणारे महोत्सव, तरुणांना चालना देणारे उपक्रम या सर्वांत अर्नाळा किल्ला परिसरातील तरुण-तरुणी हिरिरीने सहभाग घेऊन अर्नाळा किल्ला परिसराचे नाव उज्ज्वल करू लागले आहेत. मात्र अर्नाळा किल्ला परिसरातून बाहेरच्या जगात पाय ठेवताना येथील ग्रामस्थांना वेळेचे भान ठेवावे लागत आहे. संध्याकाळी सातनंतर अर्नाळा किनारपट्टीवर पोहोचल्यानंतर बोटीअभावी नागरिकांना किनाऱ्यावरच थांबावे लागते. दरम्यान, येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे बांधकामही संथगतीने सुरू असल्यानेच नागरिकांच्या घरांची दरवर्षी पडझड होते, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अर्नाळा किल्लावासीयांच्या पदरी घोर निराशा, जेट्टीचे काम कासवगतीने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:50 AM