पारोळ : अनेक अडचणींमुळे लटकलेले नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम अखेर रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या परवानगीअभावी उड्डाणपुलाचे काम रखडले होते. नागरी भावनांचा आदर करत तसेच दैनंदिन समस्यांचा निपटारा करण्याच्या हेतूने या उड्डाणपुलाचे काम येत्या तीन ते चार महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. तसे रेल्वेने एमएमआरडीए प्रशासनाला कळवले आहे. हे उड्डाणपुलाचे काम मार्गस्थ झाल्यास नागरिकांचा बराचसा वेळ आणि कष्ट वाचणार आहेत.
नायगाव पूर्व विभागाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वसई ते मुंबई हे अंतर कमी व्हावे यासाठी नायगाव येथे या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करता मुंबई महानगरविकास प्राधिकरणाने या पुलाच्या कामासाठी एकूण ५६ कोटी २५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २०१५ मध्ये पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी दोनच वर्षात पुलाच्या बांधकामाचा कठडा तुटून पडल्याने बांधकामाच्या दर्जावरच बोट ठेवत वादंग निर्माण झाला होता. अखेर पुलाच्या बांधकामाचा दर्जा तपासून तो पुन्हा चार वर्षात निम्म्यापेक्षा अधिक पूर्ण करण्याची कसरत करण्यात आली. नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया उड्डाणपुलाच्या बांधकामाने वसई-विरार ते मुंबई हे अंतर तब्बल २५ किलोमीटरने कमी होण्यास मदत होणार आहे. साहजिकच या पुलाचा वाहतुकीला फायदा होऊन मुंबई शहर अवघ्या काही तासात गाठता येणे शक्य होणार आहे.
सद्यस्थितीत पुलाचा एक पाया नायगाव येथील दोन रेल्वे रुळांमध्ये निश्चित करण्यात आल्याने या पश्चिम रेल्वेच्या जागेत बांधकाम करण्यासाठी एमएमआरडीएला रेल्वेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या परवानगीला विलंब झाला. जवळपास एप्रिल २०१९ पासून या पुलाचे बांधकाम पावसामुळे आणि परवानगीअभावी रखडले होते. पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा करण्यासाठी आ. क्षितिज ठाकूर यांनी एमएमआरडीए अधिकारी आणि पश्चिम रेल्वे अधिकारी यांची संयुक्त बैठक नोव्हेंबर २०१९ मध्ये घेऊन रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली होती.नायगाव पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी महामार्गावरून जावे लागते, मात्र आता या उड्डाणपुलामुळे हा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे. यामुळे इंधन आणि वेळ दोन्हीची बचत होणार आहे.
पुलाच्या बांधकामासाठी आ. क्षितिज ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर योग्य त्या प्रक्रिया पूर्ण होऊन पश्चिम रेल्वेने या पुलाच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. या पुलाला परवानगी दिल्याचे पश्चिम रेल्वेच्या विभागीय इंजिनिअरनी एमएमआरडीएच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांना पत्राद्वारे कळविले आहे.