हितेन नाईक पालघर : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवून रोजगार, व्यवसायाची दारे पुन्हा उघडत संपूर्ण अर्थव्यवस्थेला रुळांवर आणण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. परंतु, सध्या ५४१४ अशा वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रशासनाच्या प्रयत्नांना खीळ घातल्याने प्रशासनासमोरील पेच वाढला आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांचा पाच हजारांचा टप्पा पार केला असून १३६ रुग्णांचे मृत्यू झाल्याने या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालायचा तरी कसा, अशा विवंचनेत प्रशासन सापडले आहे. रुग्ण सापडलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करून कोरोनाची साखळी तोडण्याचे जोरकस प्रयत्न प्रशासनाने चालविले आहेत. विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला पूर्ववत रुळांवर आणण्याचे प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आपल्या टीमसह करीत असताना त्यांच्या प्रयत्नांना जनतेने आपली भक्कम साथ देणे गरजेचे बनले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार ४१४ इतकी असून १३६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दोन हजार ५७0 रुग्ण आतापर्यंत कोरोना आजारातून बरे झाले असून दोन हजार ५४२ रुग्ण सद्य:स्थितीत दाखल करण्यात आले आहेत. एकूण कोरोनाच्या चाचण्या केलेल्यांची संख्या ३३ हजार ७५९ इतकी असून एक हजार ६४ लोकांचे अहवाल मिळालेले नाहीत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केळव्यातील पर्यटन व्यवसाय जवळपास १५ मार्चपासून ठप्प आहे. बहुतांश व्यावसायिकांचे पर्यटन हे उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने सर्व व्यावसायिक संकटात सापडले आहेत.कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबरच अनेक व्यावसायिकांनी बँकेचे कर्ज काढून उद्योग सुरू केले आहेत. अशा व्यावसायिकांवर दुहेरी संकट असून याबरोबरच आपल्या कामगारांची, कुटुंबीयांचीही देखभाल करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या संकटाच्या काळात शासनाने कर्जामध्ये सवलत, विजेची बिले कमी करून या व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. तसेच या कोरोना काळानंतर पर्यटक परदेशी पर्यटन तसेच देशांतर्गत लांबचे पर्यटन टाळतील, असा अंदाज असून यासाठी शासनाने पश्चिम किनारपट्टीवर पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी पर्यटन व्यावसायिकांना बरोबर घेऊन आकर्षक योजना राबविणे गरजेचे आहे, असे मत केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे अध्यक्ष आशीष पाटील यांनी व्यक्त केले. सर्वात जास्त नुकसान सोने-चांदी (ज्वेलरी शॉप) दुकानदारांचे झाल्याचे सांगण्यात येत असून जिल्ह्यातील आठ तालुक्यांत सुमारे ९०० च्यावर ज्वेलर्सची दुकाने आहेत. वर्षभरातील सोने खरेदीचे महत्त्वपूर्ण सण असलेले अक्षयतृतीया, गुढीपाडव्यादरम्यान लॉकडाऊन असल्याने नुकसान झाले, असे सराफ, सुवर्णकार फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जैन म्हणाले.लॉकडाऊनमुळे सुवर्णकारांचे मोठे नुकसान झाले. सोन्याचा भाव ५० हजारांपर्यंत पोहोचल्याने येत्या गणपती, दिवाळी या सणांतही व्यवसायात मंदी येण्याची शक्यता आहे. - अरुण जैन, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सराफ, सुवर्णकार फेडरेशन, पालघरजिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुभार्वाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, कोरोना योद्धा दिवसरात्र राबत असून कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आदी उपचारांची भक्कम फळी उभारण्यात आली आहे.नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असून अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये. - डॉ.किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी, पालघरकाय सुरू?लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य व्यवसाय गेल्या चार महिन्यांपासून बंदच होते. मात्र, आता सरकारने त्यात शिथिलता आणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या अटीवर कपड्यांची दुकाने, हार्डवेअर, केशकर्तनालये, ब्युटीपार्लरसह अनेक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे.लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवसाय बंद पडले होते. त्यात केशकर्तनकारांचा व्यवसायही बंद झाला होता. मात्र, आता सरकारने आम्हाला नियम पाळून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आमच्या व्यवसायबंधूंची होणारी उपासमार थांबेल, अशी अपेक्षा आहे. - विजू पटेल, केशकर्तनकार
काय बंद?जिल्ह्यातील सिनेमा थिएटर, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, कोचिंग क्लासेस, रिसॉर्ट, परमिट रूम, हॉटेल, मंगल कार्यालये मार्च महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीपासून बंद पडले आहेत. चार महिन्यांपासून बंद असल्याने सर्व साहित्यावर बुरशी साचून कपडे, बूट आदी साहित्य खराब झाले आहे.जिल्ह्यातील सिनेमागृहे सुरुवातीपासून बंद पडल्याने प्रेक्षकांनी आता वेबसिरीजकडे आपला मोर्चा वळविला आहे. थिएटर्स, विद्युतपुरवठा, कामगार आदींचा महिनाभराचा खर्च हा एक लाख २५ हजारांच्या घरात पोहोचत असल्याने हा व्यवसाय आता बंद करण्याशिवाय गत्यंतर नाही. - अरुण माने, मालक, गोल्ड थिएटर्स, पालघर