नालासोपारा (मंगेश कराळे) :- घरफोडी, चोरी करणाऱ्या तीन आरोपींच्या गुजराती टोळीला अटक विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल करून १ लाख २४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
विरारच्या विठ्ठल हरी टॉवरमध्ये राहणारे आनंद जैन (४३) यांच्या घरी ९ फेब्रुवारीला लाखोंची घरफोडी झाली होती. चोरट्याने हॉलला लागून असलेल्या बालकनीकडील स्लायडिंग खिडकीतून आत प्रवेश करून सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, कानातील टॉप्स, सोन्याचे इतर तुकडे, रोख रक्कम असा एकूण १ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. विरार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन वरिष्ठांचे मागदर्शनाखाली चार वेगवेगळी पथके तयार केली. गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजुस मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे आधारे संशयीत आरोपीचा मागोवा काढत होते. नमुद आरोपी हे वापी येथे असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन गुप्त बातमीदार व तांत्रिक माहीतीच्या आधारे गुन्हयातील २ आरोपींना वापी तसेच १ आरोपीला उरण येथुन सापळा रचुन शिताफिने सराईत ताब्यात घेतले. आरोपी दिपक भाकीयादार ऊर्फ बोबडया (२८), मोहमद तारीक खान ऊर्फ टिंकल (३२) आणि धमेंद्र पासवान (३५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपीकडून चौकशी दरम्यान १२.५२० ग्रॅम सोन्याचे दागिने, वेगवेगळया कंपन्यांचे २ मोबाईल फोन आणि ३३ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण १ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. नमुद सराईत आरोपी दिपक याचेवर गुजरातमधील वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली १३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी मोहमद तारीक याचेवर गुजरातमधील वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली ६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशिलकुमार शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, नामदेव ढोणे व संतोष खेमनर यांनी केली आहे.