- अनिरूध्द पाटीलबोर्डी : पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता शाळा नवखी असल्याने वर्गात बसल्यावर अनेकजण रडारड करतात. ते काही केल्या थांबत नसल्याने गुरुजनांनी त्यांचे पालकत्व स्विकारून गप्पा-गोष्टी, नाच-गाणी तसेच विविध खेळांच्या माध्यमातून त्यांना लळा लावण्याचे काम करावे लागते. दरम्यान शाळा सुरु होऊन आठवडा झाला असून हा फंडा वापरल्याने विद्यार्थी वर्गात रु ळताना दिसत आहेत.इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या मायेची आणि अंगणवाडीत मिळालेल्या प्रेमाची सवय झालेली असते. त्यामुळे पहिल्यांदाच शाळेची पायरी चढल्यावर कावरी-बावरी होऊन त्यांना भीतीने रडू कोसळते. शिक्षक नवखे असल्याने मन मोकळं करायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर असतो. दरम्यान या विद्यार्थ्यांना शाळा आवडली पाहिजे. त्यांचे मन रमून घरासारखं वातावरण निर्माण होणं महत्त्वाचं आहे. अन्यथा शाळा व शिक्षकांबद्दल भीती व अनास्था निर्माण होऊन शाळेत येण्यास टाळाटाळ सुरु होते. त्याचा परिणाम काही विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेपासून कायमचे दुरावयची भीती असल्याची शक्यता शिक्षक विजय पावबाके यांनी व्यक्त केली. म्हणूनच पहिल्या दिवसापासून शाळांमध्ये विविध उपक्र म राबवून नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. सजवलेल्या बैलगाड्या, चारचाकी वाहनातून विद्यार्थ्यांची वाजत गाजत गावभर मिरवणूक काढली जाते. पुष्पहार, औक्षण, गोड खाऊ देवून त्यांचे स्वागत केले जाते. त्यातूनच त्यांना शाळेचे आकर्षण वाटून शाळेत येऊ लागतात.गप्पा, गाणी अन् नाच...हा आदिवासी जिल्हा असून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या समाजातील अल्प उत्पन्न गटातील पालकांचे पाल्य शिक्षण घेताना दिसतात. त्यांना दिवसभर मोकळेपणाने हुंदडायची सवय असल्याने वर्गात बसल्यावर काही वेळातच घराकडे जाण्यास विद्यार्थ्यांचा ओढा असतो. शिवाय त्यांना प्रमाण भाषेचा अधिक परिचय नसल्याने गुरु जी तोडकी-मोडकी आदिवासी बोली भाषेतून संवाद साधतात. गप्पा, गाणी गोष्टी आणि नाच यातून त्यांना लळा लावून गुरुजी त्यांच्याकरिता पालक बनतात.
गुरुजी झाले विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी शाळेत रूळताना शिक्षक घेतात परिश्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:23 AM