शशी करपे, वसईमुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक असलेला वर्सोवा खाडी पूल धोकादाक असल्याने त्यावरून जाण्यास जड वाहनांना बंदी असल्याचा फलक हायवेच्या दूरवर असलेल्या पोलीस चौकीच्या भिंतीवर लावून प्रशासनाने हलगर्जीपणाचा केला आहे. यावर कळस म्हणजे गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी मोठ्या लक्झरी बसेससह ट्रक आणि अवजड वाहनांसह अनेक वाहने त्यावर उभी केली जात आहेत.१९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत असून यावरून अवजड वाहनांना वाहतुकीला प्रतिबंध करावा असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना ११ जुलै २०१४ रोजी दिले होते. मात्र, त्यानंतरही या पूलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात ेयेत आहे. त्यातही हा पूल धोकादायक असल्याने त्यावरून १५ टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई असल्याचा फलक वर्सोवा पूलाच्या पलिकडे रस्त्यापासून दूरवर असलेल्या पोलीस चौकीच्या भिंतीवर लावण्यात आलेला आहे. चौकीसमोर सिग्नल आहे. चौकी हायवेपासून तशी दूरवर असून त्या फलकाकडे तशी कुणाची नजरही पोचत नाही. फलक कुणाच्या लक्षातही येणार नाही अशा जागी लावण्यात आलेला आहे. हायवेच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांना वाहतूक बंदी असल्याचा एकही सूचना फलक लावण्यात आलेला नाही. यावरून पूल धोकादाक असतानाही प्रशासनाचे उदासिन धोरण चव्हाट्यावर आले आहे. रात्रीच्या वेळी चौकीत पोलिसांचा राबता खूपच कमी आहे. त्यामुळे वर्सोवा पुलावरून अवजड वाहनांची सर्रासपणे वाहतूक होताना दिसते. पुलाच्या कडेला अथवा पूलावर वाहनांना थांबण्यास मनाई करावी असेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बजावले आहे. मात्र, गुजरातकडे जाणाऱ्या मोठ-मोठ्या लक्झरी बसेस प्रवासी भरण्यासाठी हायवे आणि पुलावरच्या थांबवल्या जातात. त्यांच्यासोबत ट्रक, टेम्पो, खाजगी वाहने यासह विविध वाहने प्रवासी भरण्यासाठी थांबलेली असतात. त्यामुळे पूलावर कायम वाहतूककोंडी झालेली दिसून असते. हा प्रकार पोलीस चौकीला लागूनच होत असताना ट्रॅफिक पोलीस त्याकडे काणाडोळा करीत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीकडेही संशयाने पाहिले जात आहे.
वर्सोवा पुलाबाबत हलगर्जी
By admin | Published: August 08, 2016 2:01 AM