लोकमत न्युज नेटवर्क मीरा रोड : भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याची रणनिती काँग्रेसमध्ये आखली जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील पूर्वीच्या आपल्याच नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देत हातावर घड्याळ बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील अनेक उमेदवारांनी आधीच भाजपा, शिवसेनेत प्रवेश करून आपले बस्तान मांडल्यानंतर खिळखिळे होऊनही या पक्षांतील गटबाजी, बंडखोरी उफाळून आली आहे. त्यातूनच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये म्हणजे पूर्वीच्या स्वगृही प्रवेश केला आहे.मीरा-भार्इंदरचे माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सांसह पक्षाचे २७ नगरसेवक, पदाधिकारी बाहेर पडल्याने आधीच राष्ट्रवादी खिळखिळी आहे. पण माजी मंत्री गणेश नाईक, माजी खा. संजीव नाईक यांच्याकडून ही गळती वेळीच थांबविण्याचे प्रयत्न झाले नाहीत. त्या काळात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत माजी उपमहापौर जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद देण्याचा आग्रह धरला. गणेश नाईक यांनीही त्यांना पद स्वीकारण्यास सांगितले. मात्र, ते स्वीकारताच पक्षात संघर्ष पेटला, गटबाजीला उधाण आले.पाटील यांनी पक्षाला राजीनाम्याचा इशारा दिल्यावर सारे काही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात आले. पण त्यातून इतर गट नाराज झाल्याने, उरलासुरला पक्षही फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी रविवारी जयंत पाटील यांनी माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, माजी नगरसेविका करुणा पाटील, सुरेश दळवी, आझाद पटेल, माधुरी तांबे, कुंदन भोईर, रजनी गुप्ता, सुरेश पांढरे, कुणाल जयंत पाटील, राजवंत सिंह, ललिता वंजत्री, रीना सैदा, प्रकाश नागणे आदी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयंत पाटील व सुरेश दळवी हे दोघेही मूळचे काँग्रेसचे नेते. त्यांच्यासह अन्य पदाधिकारी पक्षात आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढल्याचे हुसेन म्हणाले.
हातावर बांधले घड्याळ!
By admin | Published: July 04, 2017 6:40 AM