अनिरुद्ध पाटील
बोर्डी : पालघर जिल्हा हा शहरी, नागरी आणि डोंगराळ भाग असे जिल्ह्याचे स्वरूप आहे. पालघरमधून मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी पालघरवासीयांची स्थिती दरवर्षी होत असते.
जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा आदी तालुक्यांतील अनेक गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात असलेल्या धरणांतील पाणी मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पुरवले जाते. मात्र धरणांशेजारीच असलेल्या अनेक गावांना मात्र पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील घोलवड गावातील मरवाडा या वस्तीतही पाणीटंचाई सुरू आहे. या ठिकाणी नळातील प्रवाहाचा दाब कमी असल्याने नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागते. हंड्याने पाणी भरून घरापर्यंत नेताना, दिवसभरात वीस लिटरही भरले जात नाही. त्यामुळे प्लास्टिक ड्रमच्या वापराने हंडासंस्कृती हद्दपार होत आहे.
तालुक्यातील समुद्रकिनारी भागात जलस्त्रोतांचे पाणी मचूळ असून, उन्हाळ्यात हे प्रमाण वाढते. घोलवड ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना राबवली आहे. मात्र ती सुरळीत नसल्याने एप्रिल, मे व जून महिन्यात टंचाई अधिक जाणवते. काही ठिकाणी जलवाहिनीला मोटारपंप जोडून होणाऱ्या पाणीचोरीने, प्रवाहाचा दाब कमी होतो, असे स्थानिक सांगतात. पाणी हंड्यात भरून पुन्हा रांगेत नंबर लावणे अशक्य होते. पुरवठा बंद करण्याच्या अंतिम टप्प्यात प्रवाहाचा दाब वाढल्यावर रांगेत लावलेले ड्रम भरले जातात. त्यानंतर सायकलीला ड्रम लावून वाहतूक केली जाते. पंधरा लिटरचा तेलाचा रिकामा प्लास्टिक ड्रम वापरला जातो. त्यातील पाण्याचा वापर शरीरास हानिकारक असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करावे लागते, अशी व्यथा महिलांनी बोलून दाखवली.