वसई : साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलन अर्धवट सोडून मागील आठवड्यात मुंबईला परतले होते. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मणक्याच्या आजारामुळे त्रस्त दिब्रिटो यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रि या करण्यात आली.आता त्यांची प्रकृती उत्तम असून अजून एक आठवडा त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती बिशप हाऊसचे सचिव फादर रिचर्ड डाबरे यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, वसईत साहित्यप्रेमींकडून फादर दिब्रिटो यांना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.उस्मानाबादमध्ये ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिलेल्या फादर दिब्रिटो यांना पाठदुखीचा त्रास जाणवत होता. व्हिलचेअरवरूनच ते संमेलनात दाखल झाले होते.उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांना नंतर मुंबईत उपचारासाठी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. मात्र नंतर त्यांच्या मणक्याच्या विकारावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता.तब्येतीच्या अस्वस्थतेमुळे त्यांना संमेलनाच्या समारोपास उपस्थित राहता आले नाही.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना आधीपासूनच पाठदुखी व मणक्याचा त्रास सुरू होता. स्थानिक डॉक्टरांनी देखील त्यांच्यावर उपचार केले होते. पण वसईतील त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ल्यानुसार अध्यक्ष संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत उपचारासाठी दाखल झाले होते.
फादर दिब्रिटो यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रि या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 7:11 AM