मीरारोड: मीरा भाईंदर शहरातील प्रमुख ठिकाणे, नाके, रस्ते, रेल्वे स्थानक आदी परिसरात प्रचंड प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण राजरोस दिसत असताना महापालिका आयुक्तांच्या डिप क्लीन ड्राइव्ह वेळी मात्र भाईंदर पश्चिम प्रभाग समिती २ मधील रस्ते चक्क फेरीवाला मुक्त पाहून नागरिकांना सुखद पण आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. परंतु आयुक्त यांची पाठ वळल्यावर पुन्हा रस्ते-पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले. त्यामुळे नागरिकांना रस्ते-पदपथ मोकळे करून न देण्यात पालिकेचा फेरीवाल्यांसोबतच अर्थपूर्ण सुसंवाद पुन्हा स्पष्ट झाला आहे.
रेल्वे स्थानक पासून १५० मीटर तर शैक्षणिक संकुल, रुग्णालय, धार्मिक स्थळ पासून १०० मीटर पर्यंतच्या परिसरात फेरीवाले - हातगाडी वाल्याना मनाई आहे. शिवाय महापालिकेने शहरातील अनेक मुख्य रस्ते हे ना फेरीवाला क्षेत्र जाहीर केलेले असून ठिकठिकाणी तसे फलक सुद्धा पालिकेने लावलेले आहेत. परंतु तरी देखील ह्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात उलट सर्वात जास्त फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे.
रेल्वे स्थानके, महामार्ग, मुख्य रस्ते, प्रमुख नाके, ना फेरीवाला क्षेत्राचे रस्ते-पदपथ हे निदान नागरिकांच्या हिताचा विचार करून रहदारी आणि वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याची मुख्य जबाबदारी महापालिका आणि गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांची आहे. मात्र ह्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कमाई मुळे फेरीवाले बसवणे व त्यांना संरक्षण देणे हे चराऊ कुरण बनले आहे.
त्यामुळेच महापालिका आयुक्त संजय काटकर पासून उपायुक्त मारुती गायकवाड, प्रभाग समिती अधिकारी, फेरीवाला पथक आदी कोणीच शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमण मुळे होणारी अडचण व कोंडी सोडवण्यास इच्छूक दिसत नाही. फेरीवाल्यांकडून वसुली प्रकरणी पालिकेचे हात देखील लाच लुचपत प्रतिबंधक शाखेच्या कारवाईत अडकलेले होते.
एरव्ही फेरीवाल्यांवर सातत्याने ठोस कारवाई पालिके कडून होत नसताना गुरुवारी मात्र भाईंदर पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, डॉ बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्ग, मोदी पटेल मार्ग, खाऊ गल्ली आदी विविध ठिकाणी एकही फेरीवाल्याची गाडी लागलेली नव्हती. एरव्ही चालायला जागा न ठेवणारे हे फेरीवाले असे दिसेनासे होऊन तसेच रस्ते-पदपथ मोकळे पाहून नागरिकांना सुद्धा सुखद धक्का बसला. परंतु नंतर लक्षात आले की, आयुक्त काटकर हे डिप क्लीन ड्राइव्ह साठी येणार असल्याने अधिकारी-कर्मचारी यांनी आधीच अर्थपूर्ण सुसंवाद साधून परिसर मोकळा ठेवला होता. आयुक्तांनी देखील अधिकाऱ्यांसह येऊन परिसरातलय रस्त्यांवर पाण्याचा मारा करून रस्ते धुवून काढले. आयुक्तांची पाठ वळताच परिसरात सर्वत्र फेरीवाल्यांनी बिनधास्त-बेधडकपणे हातगाड्या, बाकडे लावून धंदा चालवला आहे.