पालघर : तालूक्यातील प्रकल्पग्रस्त ठरलेल्या अक्करपट्टी ग्रामपंचायतीला एनपीसीएल कडून देण्यात आलेल्या लाखो रू. च्या निधीच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ठेकेदार विनायक कामत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असताना पालघर नगरपरिषदेने त्याला १ कोटी ५९ लाख ७७ हजार ८८८ रू.चा ठेका दिला आहे.तारापूर न्युक्लिअर पॉवर स्टेशन अंतर्गत सीएसआर फंडामधून अक्करपट्टी या प्रकल्पग्रस्त गावातील विकासकामासाठी ५८ लाखाचा निधी देण्यात आला होता. परंतु या निधीच्या वापरात मोठा भ्रष्टाचार झाल्याने या प्रकरणात पंचायत समितीचे अभियंता विजय बिऱ्हाडे, ग्रामसेविका मीना पाठारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर सरपंच हेमांगी राऊत, ग्रामसेविका पाठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या कामाचे ठेकेदार मेघना इंटरप्राईजेस पालघरचे विनु कामत व अभियंता बिऱ्हाडे यांच्यावर पालघर पंचायत समितीकडून विषेश कृपादृष्टी दाखविली जात असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जात होती. परंतु अक्करपट्टी ग्रामपंचायतीचे सदस्य हेमेंद्र पाटीलयांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर या दोन्ही ठेकेदार व अभियंत्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चुकीने राहून जाण्याची नामुष्की पंचायत समितीवर ओढवली. ग्रामपंचायतीच्या मासीक सभेच्या आठ दिवस अगोदरच ठेकेदार विनू कामत यांच्या मेघना इंटरप्रायजेसच्या नावाने प्रथम २० लाख ८७ हजार ६७२ रू. नंतर २७ लाख व नंतर १० लाख ११ हजार ७३४ रू. धनादेशाद्वारे २७ एप्रिल २०१३ दरम्यान देण्यात आल्याचे तक्रारदार पाटील यांनी सांगितले व सदर काम पूर्ण नसतानाही ठेकेदाराला ३४ लाख रू. जादा देऊन गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अभियंता विजय बिऱ्हाडे यांनी सरपंच, ग्रामसेविका व ठेकेदार यांच्याशी संगनमत करून या विकासकामात मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले.या प्रकरणात सरपंच व ग्रामसेविकेवर कारवाई झाली असताना अभियंता बिऱ्हाडे व ठेकेदार विनु कामत यांच्या विरोधात कारवाई करण्यास तारापूर पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. दुर्गेश शेलारावर कुणाचे दडपण आले आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे ठेकेदाराचे वर्चस्व असलेल्या पालघर नगरपरिषदेनेही विनु कामत यांच्या वादग्रस्त कंपनीला तब्बल १ कोटी ५९लाख ७७ हजार ८८८ रू. चा नवा ठेका दिल्याची माहिती नगरपरिषद पालघर कार्यालयाने दिली.लोकआयुक्तांमार्फत चौकशी होऊन संबंधीत सरपंच, ग्रामसेविका, ठेकेदार व अभियंता यांना दोषी ठरविण्यात आले असतानाही पालघर पंचायत समिती अशा वादग्रस्त लोकांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
वादग्रस्त ठेकेदाराला दीड कोटीचे कंत्राट
By admin | Published: December 17, 2015 12:27 AM