कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा येथील बल्याणी गावातील बंदे खाँ शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक मोहंमद हसीब अन्सारी (४२) यांचा सोमवारी विद्यार्थ्यांना शिकवत असताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
अन्सारी हे मुलाना शिकवत असताना अचानक खाली कोसळले. हा प्रकार पाहून मुलांनी आरडाओरडा करुन अन्य शिक्षकांना बोलावले. अन्य शिक्षकांनी अन्सारी यांना तातडीने उपचारासाठी टिटवाळा येथील खाजगी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अन्सारी बंदे खाँ यांनी उर्दू माध्यमाच्या महापालिका शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत महापालिकेने त्यांचा सलग तीन वर्षे गौरव केला होता. २००५ साली अन्सारी यांची शिक्षकपदी नियुक्ती केली गेली. त्यावेळी शाळेत ३०० विद्यार्थी शिकत होते.
अन्सारी यांच्या प्रयत्नांनी आज ही संख्या दोन हजार झाली आहे. मुलांना जागा नसल्याने मुले वºहांड्यात शिकतात. महापालिकेने त्याठिकाणी शाळेची इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. अन्सारी यांनी घरोघरी जाऊन मुलांना उर्दू शाळेच्या प्रवाहात आणले होते. बल्यामी गावात त्याच्या कार्याची दखल घेतली जात होती. अन्सारी हे मूळचे मालेगावचे असल्याने त्यांचा दफनविधी तेथे होणार आहे.