वसई : राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे वसई-विरार, मीरा-भाईंदर आयुक्तालय. या नव्या पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय वसई तालुक्यातच असावे, अशी महत्त्वाची सूचना आ. विवेक पंडित यांच्यासहित वसईच्या पश्चिम पट्ट्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते मनवेल तुस्कानो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अर्थातच, या संदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार असल्याने या दोन्ही नेत्यांचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
आ. विवेक पंडित यांनी राज्य शासनाने घेतलेल्या वसई-विरार, मीरा-भार्इंदर या नव्या प्रस्तावित आयुक्तालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या नव्या आयुक्तालयाचे मुख्यालय निश्चित करताना वसई तालुक्यात ते गठीत करणे अधिक संयुक्तिक ठरेल, अशी पंडित यांची सूचना आहे.
वसई तालुक्याची लोकसंख्या मिरा-भाईंदर शहरापेक्षा नक्कीच जास्त असून गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि चालू काळातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता या भागात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. तर वसई-विरार भागात १९९५ नंतर घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल आजपर्यंत झालेली नाही. याउलट गुन्हा झाला असतानाही गुन्हा कोणी व का केला ही बाब अद्यापही निष्पन्न होत नसल्याने पोलीस यंत्रणांनी गुन्ह्यांची प्रकरणेच चक्क दप्तरबंद केल्याचे पंडित यांचे म्हणणे आहे. एकूणच सरकारने उशीरा का होईना पण एक उत्तम असा निर्णय घेतला. त्यामुळे नव्या पोलीस आयुक्तालयाबद्दल जनसामान्यात विश्वासार्हता निर्माण होऊ शकेल, असे पंडित यांनी सांगितले. तर ज्येष्ठ समाजवादी नेते मनवेल तुस्कानो यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.
वसई-विरारच्या गुन्हेगारीचा चढता आलेख !वसई-विरार भागात विविध प्रकारातील गुन्हेगारांची संख्या मोठी असून येथे घडत असलेल्या गुन्ह्यांचा आलेख चढता आहे. तुलनात्मकरित्या मीरा-भार्इंदर शहरात गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र या सर्व कारणास्तव वसई-विरार, मीरा-भार्इंदर या दोन प्रगत व जोड शहरांच्या नव्या प्रस्तावित पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय वसईतच निर्माण करणे उचित ठरेल असेही विवेक पंडित यांनी शेवटी म्हटले आहे.त्यातच ज्येष्ठ समाजवादी नेते तथा गुन्हेगारांच्या विरोधात नेहमीच लोकशाही मार्गे प्रतिकार करण्यासाठी उभे राहण्याचे बळ देणारे मनवेल तुस्कानो हे २५ वर्षांपासून सागरी आयुक्तालय गठीत करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करीत आले आहेत.
त्यामुळे सागरी सुरक्षितता लक्षात घेऊन भार्इंदरमधील उत्तन राई ते पालघर जिल्ह्याच्या गुजरात सीमेवरील झाई बंदर भागापर्यंत सागरी पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यात यावे, अशी त्यांची सातत्यपूर्ण मागणी राहिली आहे. या मागणीसाठी त्यांनी दीर्घकाळाने आंदोलने केली आणि शासनाकडे नियमितपणे शेकडोवेळा पत्रव्यवहारही केला आहे. वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांसाठी नव्या पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीचा राज्य शासनाने निर्णय घेतल्याने मागणीला न्याय मिळाल्याचे तुस्कानो म्हणाले.