भाईंदर : नालेसफाई नीट झाली नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई नीट होत नाही तसेच कचरा उचलण्यात केला जाणारा भेदभाव आदी कारणे मांडत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी शुक्रवारच्या महासभेत मीरा-भार्इंदर महापालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याकडून आरोग्य आणि वैद्यकीय विभागांचा पदभार काढून घेण्याचा ठराव केला. ठरावास शिवसेना, काँग्रेसनेही समर्थन दिले.
मीरा-भार्इंदर महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून न दिल्यास त्या गृहनिर्माण संस्थांचा कचरा उचलणे बंद केले आहे. नळजोडणी खंडित करण्याच्या नोटिसाही बजावल्या आहेत. घनकचरा अधिनियमानुसार ओला व सुका कचरा वेगळा करून देणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक आहे. शिवाय, पालिकेने उत्तन येथे सुरू केलेल्या कचरा प्रकल्पातही कचरा वेगळा करून दिल्यास त्यावर प्रक्रिया करणे शक्य होते. त्यामुळे पालिकेने कचरा वर्गीकरण करून देणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचा कचरा उचलणे बंद केले. त्यामुळे अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग लागले आहेत. कचरा साचून राहिला तरी अनेक लोक वर्गीकरण मात्र करूनच देत नसल्याने दुर्गंधी पसरते.शुक्रवारच्या महासभेत भाजपचे अॅड. रवी व्यास, ध्रुवकिशोर पाटील, दीपिका अरोरा, मीरादेवी यादव, नयना म्हात्रे, पंकज पांडेय आदी नगरसेवकांनी कचरा उचलण्यात प्रशासन भेदभाव करत असल्याचा आरोप केला. भार्इंदरच्या कोठार झोपडपट्टी, गीतानगर आदी भागांचे दाखले देऊन तेथे कचरा एकत्रच टाकला जात असताना तो उचलते. मग, इमारतींमधील कचरा उचलण्यास नकार देऊन भेदभाव करते अशी टीका केली.अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होईलभाजपचे जयेश भोईर यांनी पानपट्टे यांच्याकडून आरोग्य आणि वैद्यकीय विभागांचा पदभार काढून घेण्याचा ठराव मांडला. त्याला सभापती विनोद म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पानपट्टे हे अनुभवी असून चुका झाल्या असतील, तर त्या सुधारून घेण्यास सांगा व संधी द्या, असे सांगितले. तर, अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने यांनीही पानपट्टे यांची बाजू घेत टॉर्चर करू नका, अधिकाºयांचे खच्चीकरण होईल, अशी विनंती नगरसेवकांना केली. परंतु, भाजप नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावास विरोध न झाल्याने तो सर्वानुमते मंजूर झाला.