भाईंदर : मीरा- भाईंदर महापालिकेचे भाईंदर पश्चिमेच्या जयअंबे नगर झोपडपट्टीतील आरोग्य केंद्र सहा महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असल्याने नागरिक वैद्यकीय सुविधांपासून वंचित आहेत. जयअंबेनगरमध्ये झोपडपट्टी आणि गलिच्छ वस्ती असून या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य केंद्रामुळे रहिवाशांना नाममात्र शुल्कात वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने मोठा दिलासा मिळतो. परंतु दुरूस्तीसाठी म्हणून हे आरोग्य केंद्र सहा महिन्यांपासून बंद आहे. आतमध्ये नवीन साहित्य आदी आणलेले आहे. रंगरंगोटी झालेली आहे. पण दुरूस्तीचे काम बाकी असल्याने आरोग्य केंद्र सुरू केले गेले नसल्याचे कारण पुढे केले जात असले तरी सूत्रांनी मात्र पालिकेकडे पुरेसे वैद्यकीय अधिकारी नसल्याने केंद्र सुरु केले जात नसल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य केंद्रात एका बाजूला सध्या लहान बालकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. परिचारीका असतात, परंतु रूग्णांवर उपचार सुरू केलेले नाहीत. नागरिक विचारणा करायला गेले की, २६ जानेवारी रोजी सुरू केले जाईल असे उत्तर ऐकायला मिळते. तर कधी विजेचे काम शिल्लक असल्याचे सांगितले जाते असे रहिवाशांचे म्हणणे आहे. आरोग्य केंद्र बंद असल्याने नाइलाजाने खाजगी डॅक्टरांकडे जावे लागते. ते खूपच जास्त पैसे घेत असल्याने आम्हाला परवडत नाही असे काही जणांनी सांगितले.आपण स्वत: या आरोग्य केंद्राची पाहणी केली आहे. स्वच्छतागृहाचे काम अजून बाकी असून ते पूर्ण झाले की केंद्र सुरू केले जाईल.- डॉ. प्रमोद पडवळ, मुख्य वैद्यकीय अधिकारीआरोग्य केंद्राची रहिवाशांना खूपच गरज आहे. कारण येथे रूग्णांची संख्या नेहमीच जास्त असते. गरीब, गरजूंना खाजगी डॉक्टरपरवडत नाही. सहा महिने झाले तरी आरोग्य केंद्र का सुरु झाले नाही याचे नेमके कारण प्रशासन व नगरसेवकही सांगत नाहीत. यातून त्यांची वैद्यकीय सेवेबद्दलची अनास्था दिसून येते. - गणेश बामणे, नागरिक