जव्हार : जव्हार तालुक्यातील १०० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या दाभेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सफाई कामगार चक्क रूग्णांची तपासणी, औषोधोपचार व इंजेक्शन देण्याची धक्कादायक बाब माध्यमांनी समोर आणताच ताबडतोब जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरीक्त जिल्हा अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने दाभेरी प्रा. आ. केंद्राला पत्रकारांसह भेट दिली. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. दरम्यान, आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.सदर सफाई कामगार हा केवळ ८ वी पास आहे. तसेच दाभेरी प्रा. आ. केंद्र हे अतिदूर्गम भागात असल्यामुळे तेथे वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य कर्मचारी काम करण्यास नाखुश असतात त्यामुळे जवळपास गेल्या ३ वर्षापासून येथील वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. नियमीत वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार हा भरारी पथकातील डॉक्टरांकडे असल्यामुळे ते कायम इतर खेड्यापाड्यात वैद्यकीय सेवेसाठी जात असतात. अशावेळी दाभेरी तसेच आसपासच्या गंभीर रूग्णांना डॉक्टरांकडून वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या मात्र त्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी वर्ग नसल्याची गंभीर बाबीकडे प्रशासनाची अनाख्याच कारणीभूत आहे. शासन निर्णयानुसार डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर ३ वर्ष ग्रामीण भागात काम करणे. बंधनकारक असताना दाभेरी तसेच अन्य दुर्गम भागात त्यांची नियुक्ती झाल्यास डॉक्टर आर्थिक, राजकीय दबाव टाकून आपली बदली करून घेतात. अथवा त्या ठिकाणी हजरच होत नाही. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
जीवेघेण्या रुग्णसेवेची आरोग्यमंत्री करणार चौकशी
By admin | Published: January 20, 2016 1:46 AM