- शशिकांत ठाकूरकासा - डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे.कासा भागात पावसाअभावी भात पेरण्या खोळंबल्या होत्या तर सायवन भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी सुरु वातीला पेरण्या केल्या त्याचे पीक पावसाअभावी करपू लागले होते. काही शेतकऱ्यांनी मोटारने, इंजिनने पाणी देऊन ती वाचविली. परंतु जेथे हे शक्य नव्हते तेथील बियाणे पाण्याअभावी न रुजल्याने वाया गेली. मात्र शुक्र वारी सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने कासा भागातील शेतीत मोठ्या प्रमाणावर सर्वत्र पाणी साचलेले होते. त्यामुळे शेतीच्या कामाना आता वेग येणार असून रखडलेली भात शेतीची पेरणी व नांगरणीची कामे सुरू होणार आहेत. कारण गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी पावसाची वाट पाहात होते. उशिरा पावसामुळे यंदा पेरणी बरोबरच रोपणीची कामेही लांबणीवर जाणार आहेत. तर यापुढेही पाऊस असाच सुरू राहिला तर भाताचे पीक चांगले येईल.कुडूसची बाजारपेठ जलमयवाडा : गेले अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र गुरूवारपासून पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने बाजारपेठेत सर्वत्र पाणी तुंबल्याने कुडूस गाव पाण्यात गेले आहे. पावसाअगोदर गटारीची साफसफाई न केल्याने पाणी तुंबल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.वाडा तालुक्यातील अनेक शेतकºयांनी कोरड भात पेरणीची कामे केली होती. मात्र त्यानंतर आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. आता कालपासून पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात शेतकºयांनी भात, नाचणी, वरई यांची कोरड पेरणीची कामे निम्म्याहून अधिक पूर्ण केली होती. कोरड पेरण्या झाल्यानंतर आठ दहा दिवस पाऊस गायब झाला होता. तो कालपासून संततधार बरसतो आहे.
कासा भागात जोरदार; शेतीच्या कामांना आता येणार वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:31 AM