लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड - मध्यरात्रीनंतर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धडकी भरवत मीरा भाईंदरकरांची झोप उडवली. शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. लोकांच्या घरात पाणी शिरले तर दुर्घटना घडू नये म्हणून वीज पुरवठा खंडित करावा लागला. पाण्यात अडकलेल्या ६९ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. महाजन वाडी येथे पाण्याच्या लोंढ्याने एका घराची पडझड तर २० ते २२ दुचाकी वाहने वाहून गेली.
शनिवारच्या मध्यरात्रीनंतर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने लोकांची झोप उडवली. पावसा मुळे लोकांच्या घरादारात पाणी शिरल्याने लोकांनी रात्र जागून काढली. शहरातील महाजन वाडी, काशिमिरा, सिल्वर पार्क, विजय पार्क, चंद्रेश, शांतीनगर, शीतल नगर, कृष्ण स्थळ, विनय पार्क, सिल्वर सरिता, पटेल कंपाऊंड, खारीगाव, तलाव मार्ग, बेकरी गल्ली, विनायक नगर, नवघर मार्ग, गोडदेव सह अन्य अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रात्री पासून सकाळ पर्यंत अनेक ठिकाणी पाणी उपसा करणारे पालिकेचे पंप सुरू नव्हते. पाण्यात अडकलेले अनेक नागरिक पंप सुरू करा म्हणून प्रयत्न करत होते.
घरांमध्ये सांडपाणी व पुराचे पाणी शिरल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे धान्य विजेची उपकरणे खराब झाली. काही भागात तर घरामध्ये गुडघ्या व कमरे एवढे पाणी साचून होते. विजेचा शॉक लागून दुर्घटना घडू नये म्हणून वीज पुरवठा अनेक भागात खंडीत करण्यात आला होता. शहरातील अनेक रस्ते तर पाण्याखाली गेले होते. लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले. इमारतीतील पाण्याच्या टाक्यां मध्ये दूषित पाणी शिरल्याने मुसळधार पावसात सुद्धा अनेकांना पाणी मिळाले नाही. औद्योगिक वसाहती व दुकानां मध्ये पाणी शिरल्याने त्यांचे सुद्धा नुकसान झाले.
महाजन वाडी येथे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील डोंगरां वरून पाण्याचा प्रचंड लोंढा वहात होता. जेणे करून येथील चाळीं मध्ये पाणी शिरले. पाण्याचा वेग इतका होता की, सुमारे २० ते २२ दुचाकी वाहून गेल्या. गावदेवी कंपाऊंड, गायत्री चाळ मधील रामू पाटील यांच्या घराची पाण्याच्या लोंढ्याने पडझड झाली. लोकांचे सामान वाहून गेले. पाण्याच्या लोंढ्यात अडकलेल्या ५२ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. माशाचा पाडा मार्ग परिसरात सुद्धा डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे पूरस्थिती बिकट बनली होती.
मुंबई अहमदाबाद महामार्ग सुद्धा पाण्याखाली गेला होता. महामार्गावर एका मोटरकार मध्ये अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाने वाचवले. गायत्री इमारतीच्या तळ मजल्यातून पाण्यात अडकलेल्या ५ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. सिल्वर सरिता इमारती मधून ५ जण तर येथील एका दूध टँकर मधून ३ जणांची सुटका केल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले.
सकाळ पर्यंत अनेक भागातील पाणी उतरले नव्हते. लोक नगरसेवकांना शोधत शिमगा करत होते. काही नगरसेवक रात्री पासून लोकांच्या संपर्कात होते तर काही मदतकार्याच्या ठिकाणी दिसत सुद्धा नव्हते. सकाळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले आदींनी शहरात फिरून आढावा घेतला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्याना तील डोंगराळ भागातून पाण्याचे लोंढे येत असताना महाजन वाडी, माशाचा पाडा मार्ग परिसरात नैसर्गीक ओढ्यां मध्ये बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. शहरातील खाड्या व नैसर्गिक नाल्यांवर सुद्धा भराव करून बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत. शहराची कवचकुंडले असलेल्या कांदळवन, पाणथळ, सीआरझेड भागात सुद्धा वारेमाप भराव आणि बांधकामे झाल्याने मुसळधार पाऊस आल्यास पाण्याचा निचरा होणारे मार्ग व वॉटरहोल्डिंग क्षेत्र मोठया प्रमाणात नष्ट केले गेल्याने शहरात पूरस्थिती होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या वर अनेकवेळा प्रकाशझोत पडून सुद्धा नगरसेवक, महापालिका व अतिक्रमण करणाऱ्यांचे साटेलोटे असल्याने त्यांचे संरक्षण पुरस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.