दिघी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनापुढे आरोग्य सुविधा पुरविण्यास अनेक समस्या येत आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात अगोदरच आरोग्य सेवांची वानवा असताना, ऑक्सिजन तुटवड्याचा गंभीर परिणाम सगळे जण अनुभवत आहेत. अशावेळी अनेक गरजूंना ऑक्सिजनची मदत करण्यास श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील युनिटी फैथ फाउंडेशन पुढे आली आहे.
युनिटी फैथ फाउंडेशनतर्फे गेली तीन वर्षे गरजूंना रात्रंदिवस रुग्णवाहिकेची सेवा मिळत आहे. या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन दोन सिलिंडरची सुविधा असून, संस्थेने सध्याच्या परिस्थितीत कोरोना व इतर रुग्णांसाठी aऑक्सिजनचा साठा वाढवला आहे. तीन वर्षांमध्ये या रुग्णवाहिकांमधून जवळपास सहाशे रुग्णांना सेवा दिली आहे.
यामध्ये वेळोवेळी संस्थेला भाडे स्वरूपात मिळालेल्या मदतीने सत्तरहून अधिक गरजूंना मोफत रुग्णवाहिकेची सुविधा मिळाल्याने तालुक्यासाठी युनिटी फैथ फाउंडेशनची रुग्णवाहिका जीवनवाहिनी ठरली आहे.कोरोनाच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या पातळीवर समाजाला मदत करण्यासाठी पुढे येत आहे. याच उद्देशाने युनिटी फैथ फाउंडेशन संस्थेचे शब्बीर खाणे, अन्सार चोगले, अथर पांगारकर व इतर सदस्य सर्व घटकांसाठी मदतीला पुढे आले आहेत.
सध्या कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते आणि ते रुग्णांसाठी जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे अशा लोकांना तत्काळ ऑक्सिजन पुरवठा करून शहरातील रुग्णालयात पोहोचण्यासाठी युनिटी फैथ फाउंडेशनने आपल्या सेवेत ऑक्सिजनचे चार सिलिंडर वाढवून मदत करण्यासाठी एक नवीन पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटकाळात संस्थेने दिलेला मदतीचा हात दिलासादायक असल्याचे बोर्लीकर सांगतात.