वाडा : वाडा तालुक्यात सीएनजी गॅस पंप नसल्याने तालुक्यातील शेकडो वाहनचालकांना गाडीमध्ये सीएनजी भरायला ३० किलोमीटर अंतर कापून भिवंडी येथे जावे लागते. यामुळे वाहनचालकांचे आर्थिक नुकसान, तसेच वेळेचा प्रचंड अपव्यय होत असल्याने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
वाडा तालुक्यात सीएनजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. सरकारने काही गाड्या सक्तीने सीएनजीवर केल्या आहेत. मात्र, तालुक्यात सीएनजी पंपच नसल्याने या गाड्यांमध्ये सीएनजी भरण्यासाठी भिवंडी येथे जावे लागत आहे. भिवंडीशिवाय दुसरा जवळपास कुठेही सीएनजी पंप नसल्याने वाहनचालक-मालकांची प्रचंड गैरसोय होते. ३० ते ४० किलोमीटर अंतरावर भिवंडी शहर असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे, तसेच भिवंडीत पोहोचेपर्यंत दीड ते दोन तास या प्रवासात जात असल्याने वेळेचाही अपव्यय होत असल्याचे चालकांनी सांगितले.
भिवंडी येथे जाताना शेलार येथे दररोज वाहतूक कोंडी होते. आधी या कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो. त्यानंतर सीएनजी पंपावरही रांग लावावी लागते. या सगळ्यांमध्ये त्यांचा तासाभराचा वेळ वाया जातो. त्यामुळे चालक हैराण होत आहेत. त्यातच भिवंडी-वाडा महामार्गाची दुरवस्था झाली असून, यामुळे वाहनांचे नुकसानही होते. तालुक्यातील कुडूस-अंबाडी, कुडूस-कोंढले, कुडूस-उचाट, कुडूस-देवघर, कुडूस-नारे-वडवली, कुडूस-वाडा, कुडूस-खानिवली, वाडा-विक्रमगड, वाडा-परळी, खानिवली-कंचाड-गोऱ्हे, अंबाडी-चांबळे, लोहपे, अकलोली, केळठण, गणेशपुरी-निबवली-गोऱ्हाड, खानिवली-पालसई-असनस कंळभई, वाडा-सोनाळे-कळंभे आदी मार्गांवर सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या प्रवाशांची वाहतूक करतात. सीएनजी भरल्यानंतर दोन-तीन दिवस पुरतो, त्यानंतर पुन्हा सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. बाहेरचे भाडे घेतले तर एका दिवसातही सीएनजी संपतो, असे चालक म्हणतात. त्यामुळे तालुक्यातील मेट, कुडूस, खुपरी, वाडा, पाली, या ठिकाणी डिझेल व पेट्रोलपंप आहेत. या ठिकाणी सीएनजी पंपाला शासनाने परवानगी द्यावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.
सीएनजी गॅसची सोय वाड्यात नसल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर सीएनजी पंप तालुक्यात सुरू करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करून प्रशासन व सरकारचे लक्ष वेधावे लागेल.- शुभम गायकर, वाहनमालक
सीएनजी पंप वाडा तालुक्यात किंवा अंबाडी परिसरात नसल्याने आम्हा रिक्षावाल्यांची गैरसोय होत आहे. सीएनजी भरायला आम्हाला पहाटे पाच वाजता उठून भिवंडी गाठावे लागते. तेव्हाही रांगा लागलेल्या असतात. पंपावर वीज नसल्यास किंवा गॅस नसल्यास तासन्तास वाट पाहावी लागते. यामध्ये आमचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच वेळेचाही अपव्यय होतो. यासाठी शासनाने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करावा.- संदीप भोईर, रिक्षा मालक