शशी करपेवसई : शरीर सौष्ठव स्पर्धेत अनेक राष्ट्रीय पदकांची कमाई. राज्यपालांकडूनही गौरव. आपल्या जीममधून देश-विदेशात चमकदार कामगिरी केलेल्या अनेक शरीर सौष्ठवपटू घडवले. मात्र, ६८ वर्षी नावाजलेला हा शरीर सौष्ठवपटू वसई रोड रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीजवळ उभा राहून गळ्यात मदतीचा फलक लावून वैद्यकीय मदतीसाठी याचना करतो आहे. कुणी मदत करता का मदत असा पुकारा करणाºया वसईतील नामांकित अनिल शेट्टी या शरीर सौष्ठवपटूच्या नशिबी सध्या हालाखीचे जीणे आले आहे.
अनिल शेट्टी यांचा लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा खेळाकडेच जास्त कल होता. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी शरीर सौष्ठवावर लक्ष केंद्रीत केले. तालुका, राज्य, राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अनेक स्पर्धा खेळताना भरपूर पदकांचीही कमाई केली. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून त्यांचा गौरवही झाला होता. मात्र, वयाच्या ६८ व्यावर्षी या नामांकित खेळाडूच्या पदरी हालाखीचे जीणे आले आहे. वयोमानानुसार त्यांना खेळायला जमत नसल्याने एकेकाळी अवतीभोवती असलेल्यांनी पाठ फिरवली आहे. त्यातच पायाला झालेल्या दुखापतीने अनिल शेट्टी त्रस्त झाले आहेत. संपूर्ण आयुष्य खेळासाठी घालवलेल्या शेट्टींची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने त्यांच्याकडे वैद्यकीय उपचार करण्यासाठीही पैसे नाहीत. अ़नेकांकडे त्यांनी मदतीसाठी हात पुढे केला. पण, कुणीही त्यांच्या हातावर पैसे ठेवले नाहीत. शेवटी आपल्या उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी ते वसई रोड रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीसमोर उभे राहून लोकांसमोर मदतीसाठी हात पसरू लागले आहेत.
त्यांना टीबी या आजाराने ग्रासले आहे. त्यावर उपचार करण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांची गरज आहे. हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. एकेकाळी पैशाच्या मागे न धावता प्रामाणिकपणे खेळ खेळले आणि आपल्या जीममधून देशाविदेशात नाव कमाणारे खेळाडू तयार केले, त्याच शेट्टींकडे वैद्यकीय उपचारासाठी पैसे नाहीत. १९७१ साली मुंबईत झालेल्या ज्युनियर स्पर्धेसाठी त्यांची पहिल्यांदा निवड झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धा गाजवल्या. खेळातील कौशल्य आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व लक्षात घेऊ़न विजया बँकेने त्यांना खेळाडूच्या कोट्यातून नोकरी दिली. पण, नोकरीमुळे खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच शेट्टींनी बँकेची चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली. खेळत असताना वसईतून चांगले शरीर सौष्ठवपटू तयार करण्यासाठी त्यांनी स्वत:ची जीम उघडली. त्यांनी शाम राहूल, मॅकलीन इनाडीस यासारखे मातब्बर खेळाडू तयार केले. इतकेच नाही तर त्यांनी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासोबत काही चित्रपटात भूमिकाही केल्या आहेत. आपला आजार बरा झाल्यावर ते पुन्हा शरीर सौष्ठवपटू तयार करण्यासाठी आयुष्य खर्ची घालणार आहेत. पण, वैद्यकीय मदतीसाठी कुणीही पुढे येत नसल्याने हतबल झालेले शेट्टी आता रस्त्यावर उतरून मदत मागू लागले आहेत.