आशिष राणे
वसई - वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभागात दिवाणमान स्थित छत्रपती अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर राहणारे भगवान सोलंकी व त्यांचे चार जणांचे कुटूंब घरात सर्वत्र पावसाचे पाणी शिरल्याने मिळेल त्या सामानाने अखेर इमारतीचे छत गाठले. मागील दोन दिवसांपासून हे गरीब सामान्य कुटुंब आपल्या दोन मुली, श्वान यांच्यासमवेत भर पावसात उघड्यावर इमारतीच्या टेरेसवर आपला संसार थाटून आहे.
लज्जास्पद म्हणजे या इमारतीच्या समोरच व काही अंतरावर सत्ताधारी बविआचे पक्षीय कार्यालय व त्यांचे जेष्ठ नेते तथा माजी महापौर नारायण मानकर यांचे निवासस्थान आहे. एकुणच वसईत अशी अनके कुटुंब कुठे कुठे स्थलांतर करीत आहेत, त्यातलं हे सोलंकी कुटुंब याबाबत त्यांना विचारले असता, ही बाब अत्यंत वेदनादायक असून मागील वर्षी ही आम्ही काही दिवस टेरेस व नातेवाईकाकडे वास्तव्यास होतो. मात्र, आता दरवर्षी पाऊस आला की आम्हाला भीती वाटत असून पावसाळ्यात दिवस कसे काढायचे. मात्र, स्थनिक प्रशासन वसई विरार महापालिका याबाबत काहीही करू शकत नाही ही शोकांतिका असल्याची तीव्र प्रतिक्रिया सोलंकी कुटुंबियांनी लोकमतला दिली.