हितेन नाईक
पालघर : ‘एकता का राज चलेगा, हिंदू-मुस्लिम साथ साथ चलेगा’ असे फलक झळकावीत राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या हजारो नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध, शांतपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मूकमोर्चा काढून या कायद्याला आपला विरोध दर्शविला.
पालघर येथील छत्रपती शिवाजी चौकपासून सकाळी ११ वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा बहुजन समाज अध्यक्ष हाजी साजिद शेख, माजी उपनगराध्यक्ष रईस खान, भूमिसेना अध्यक्ष काळूराम धोदडे, शशी सोनवणे, काँग्रेसचे सिकंदर शेख, समी पिरा, वंचित बहुजन आघाडीचे गणेश प्रधान, दलित पँथरचे आतिष राऊत, सीपीएमचे बारक्या मांगात, राष्ट्रवादीचे सचिन पाटील, बशीर शेख, आरपीआय आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यासह महिलांचा मोठा सहभाग असलेल्या हजारोंच्या संख्येने लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते.नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या कायद्यात केलेली दुरुस्ती ही अन्यायकारक व घटनाविरोधी आहे. नागरिकत्व कायद्यात झालेल्या सुधारणेमध्ये धर्माच्या आधारावर देण्यात येणारे नागरिकत्व हे संविधानाच्या कलम १४ व २१ चे उल्लंघन असून भारतीय संविधान कोणत्याही धर्म व्यवस्थेवर आधारित नसून धर्मनिरपेक्ष लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय व्यवस्थेवर आधारित आहे. परंतु संविधानातील धर्मनिरपेक्ष व्यवस्थेतील मूळ संविधानिक ढाचा नष्ट करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार या कायद्याच्या माध्यमातून करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संविधानातील मूळ राष्ट्रीय नागरिकत्व कायदा म्हणजे मूळ निवासी बहुजन समाजावर व धर्मनिरपेक्ष लोकशाही संविधानावर आघात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.संविधान व लोकशाही व्यवस्थेची पायमल्लीदुरुस्तीच्या नावाने धार्मिक आधार दुरुस्त करण्यात आला असूनही संविधान व लोकशाही व्यवस्थेची ही पायमल्ली आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गौरव मिळवून देणाºया संविधानाची पायमल्ली होत असल्याची भावना या वेळी मोर्चेकऱ्यांनी भाषणातून व्यक्त केली. या वेळी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विधेयक व सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायदा त्वरित रद्द करण्यात येऊन देशात कायदा-सुव्यवस्था व शांतता कायम राहावी, असे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली३० पोलीस अधिकारी, २६० महिला व पोलीस कर्मचारी, १ एस.आर.पी. पथक असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.