पालघर : बहुजन विकास आघाडीच्या जिल्ह्यातील तीनही आमदारांनी महाविकासआघाडीच्या सरकारला पाठिंबा जाहीर केल्याने लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात बविआचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेसची झालेली दयनीय अवस्था पाहता राष्ट्रवादीची ताकद वाढण्याच्या दृष्टीने विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आ. सुनील भुसारा यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.
बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सेना नेत्यांकडून बविआ आणि आ. ठाकूर यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती. परंतु सध्या त्यांच्या तीनही आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, सध्या पाठिंबा देणाºया सहकारी मित्रपक्षाच्या भूमिकेत ते असल्याने त्यांना कशा पद्धतीने सामावून घेतले जाते हे दिसून येणार आहे. यापूर्वीही एकदा चालून आलेले मंत्रीपद आ. ठाकुरांनी नाकारले होते. आणि त्याऐवजी आपल्या क्षेत्राच्या विकासाच्या नावावर अनेक योजना पदरी पाडून घेतल्या होत्या. मात्र, आता निवडणुकीची शेवटची टर्म असल्याचे जाहीर करणाºया आ. हितेंद्र ठाकुरांची रणनीती काय असणार, हे लवकरच उघड होणार आहे.
दुसरीकडे खा. राजेंद्र गावीत यांच्या रूपाने काँग्रेसला जिल्ह्यात उभारी मिळत असल्याचे दिसत असतानाच काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून गावितांनी प्रथम भाजप आणि नंतर शिवसेनेचा रस्ता धरल्याने जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवल्याने काँग्रेसच्या या दयनीय अवस्थेचा फायदा उचलण्याची संधी राष्ट्रवादीकडे चालून आली. त्यामुळे विधानसभेसाठी राष्ट्रवादीने शिवसेनेचे माजी आ. अमित घोडा यांना बंडखोरी करायला लावत उमेदवारी दिली होती.
मात्र हा डाव शिवसेनेने उधळून लावल्याने राष्ट्रवादी संधीच्या शोधात होती. आता राष्ट्रवादीकडून आमदार सुनील भुसारा यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावून पुढच्या महिन्यात होणाºया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्ष वाढीचे प्रयत्न केले जाऊ शकतात. किंवा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रीपद देऊन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिल्यास राष्ट्रवादी लोकसभा आणि पालघर विधानसभा जागेवर दावा करू शकते.
दरम्यान, सध्या महाराष्ट्राचे राजकारण ठाणे जिल्ह्याभोवती फिरताना दिसत आहे. १८ आमदारांच्या या जिल्ह्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अद्यापही खातेवाटपावरुन गु्ऱ्हाळ सुरूच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आता या मंत्रिमंडळांत स्थान मिळणार का? याबाबत मात्र अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. यासाठी काहींकडून जोरदार लॉबिंग सुरू असले तरी काहींच्या अपेक्षांना नाराजीचा सुरुंग लागणार असल्याचेच चित्र सध्या दिसत आहे.
शिवसेनेतील पाचपैकी एकनाथ शिंदे यांचे नाव सुरुवातीपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडेच मुख्यमंत्रीपद ठेवले आहे. त्यामुळे आता शिंदेच्या वाट्याला कोणते खाते येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून खलबते सुरू आहेत.
जितेंद्र आव्हाड पालघरचे पालकमंत्री?
मुंब्रा - कळव्यातून सलग हॅट्रिक साधणारे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान हवे आहे. सुरुवातीला त्यांना पालघरचे पालकमंत्रीपदी आणि कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र आता नशीबात जे असेल ते मिळतेच, जे नसते ते मिळत नाही, अशी पोस्ट सध्या त्यांची फेसबुकवर फिरत आहे, त्यामुळे त्यांच्या नशीबात लाल दिव्याची गाडी आहे, किंवा नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.