लोकमत न्यूज नेटवर्क, विरार : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वसई-विरार महापालिका मुख्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी सामान्य नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे पालिका अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याचे पाहून वसई विधानसभा मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर चांगलेच संतापले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत चक्क शिवीगाळ केली. तसेच महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांना ‘ऑफिसमध्ये येऊन फटकावेन’ अशा भाषेत दमदाटी केली.
अनधिकृत बांधकामे, अनियमित पाणीपुरवठा, अनधिकृत पार्किंग व आठ वर्षांपासून रखडलेले फेरीवाला धोरण, महावितरणचा गैरकारभार, अशा विविध समस्यांवर सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार ठाकूर यांच्यासमोर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न केले. जनतेच्या या प्रश्नांचा प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या खुलाशाने नागरिकांचे समाधान होत नसल्याचे पाहून आमदारांनी भर सभागृहात उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत शिवीगाळ केली. तर काही प्रश्नांवर उत्तर देणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांना गप्प करत मला पालिका आयुक्तांकडूनच उत्तर हवे, असेही खडसावले.
नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्यांवर दोन दिवसांत तोडगा काढला जाईल. जेथे कारवाई करावी लागेल, त्याठिकाणी कारवाई करून प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जनता दरबारात नागरिकांना दिले.
महापालिकेवर प्रशासकीय राजवट
मागील तीन वर्षांपासून वसई-विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. या काळात अधिकारी ऐकेनासे झाले आहेत. त्यांना आपला धाक राहिलेला नाही, असा समज बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा झालेला आहे. अधिकाऱ्यांचा हा समज खोटा ठरवण्यासाठी व नागरिकांत आपली वाहवा घडवून आणण्यासाठीच आमदारांनी जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना जनता दरबारात धारेवर घेतले असावे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.