- शशी करपे ।वसई : या तालुक्यातील आठ पैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये बविआ विरोधकांचे सरपंच निवडून आले आहेत. तालुक्यावर सत्ता गाजवणाºया बहुजन विकास आघाडीला फक्त तीनच सरपंचपदांवर समाधान मानावे लागले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वसई विधानसभा मतदारसंघातील पाचपैकी चार ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवून विरोधकांनी ठाकूरांना धक्का दिला आहे.वसई तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सरपंचांच्या थेट निवडीसह पार पाडल्या. बहुजन विकास आघाडी आणि श्रमजीवी संघटनेत गावात आपापसात समझौता झाल्याने पूर्व पट्टीतील टोकरे-खैरापाडा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. याठिकाणी सरपंचपदी श्रमजीवी संघटनेच्या अनिता देसक बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर श्रमजीवीचे पाच आणि आघाडीचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. खर्डी ग्रामपंचायतीत सात पैकी सहा जागा आघाडीने बिनविरोध जिंकल्या होत्या. त्याचबरोबर आघाडीच्या रेखा भोईर सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर एका सदस्यासाठी निवडणूक झाली. ती जागा बहुजन विकास आघाडीने जिंकली. पूर्व पट्टीतील टिवरी ग्रामपंचायत आघाडीने शिवसेनेकडून खेचून घेतली. याठिकाणी शिवसेनेतच बंडाळी झाल्याने आघाडीने नऊपैकी सहा जिंकल्या. तर शिवसेनेला फक्त दोन जागा जिंकता आल्या. एक अपक्ष निवडून आला. शिवसेनेचे विद्यमान सरपंच चंद्रकांत चौधरी यांना बंटी पाटील या अपक्षाने पराभूत केले. सरपंचपदी आघाडीच्या बाजारी नरेश ठक्कर निवडून आल्या.पूर्व पट्टीत आघाडीने तीन पैकी दोन ग्रामपंचायती जिंकल्या असल्या तरी पश्चिम पट्टयात मात्र आघाडीला फक्त एकच ग्रामपंचायत जिंकता आली. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघात विरोधकांनी एकजूट करून पाचपैकी चार ग्रामपंचायती जिंकून ठाकूरांना धक्का दिला. विवेक पंडित यांच्या जनआंदोलनाकडे असलेल्या खोचिवडे ग्रामपंचायतीतील ९ सदस्य आणि सरपंचपद आघाडीने जिंकून एकहाती सत्ता खेचून आणली. याठिकाणी सरपंचपदी आघाडीचे नंदकुमार वैती निवडून आले.विवेक पंडित यांच्या वसईतील राजकारणातून एक्झिट झाली असली तरी कोणतेही नेतृत्व नसतांनाही जनआंदोलन समिती जिवंत ठेवण्याची धडपड काही कार्यकर्ते करीत आहेत. त्यांना यावेळी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेची साथ मिळाली. त्यामुळे या एकजुटीने पश्चिम पट्ट्यात ठाकूरांना रोखण्यात यश मिळविले. रानगाव ग्रामपंचायत स्वबळावर लढवून भाजपाने ८ जागा जिंकल्या. आघाडीला दोन तर शिवसेनेला एक-एक जागा जिंकता आली. सरपंचपदी भाजपाच्या निलम मेहेर निवडून आल्या.टेंभी-कोल्हापूर ग्रामपंचायतीच्या ११ पैकी सहा जागा बहुजन विकास आघाडीने जिंकल्या. पाच जागी जनआंदोलन, भाजपा आणि शिवसेना आघाडी निवडून आली असून सरपंचपदी आघाडीच्या माधुरी मांगेला निवडून आल्या. विद्यमान सरपंच पुष्पा घोरविंदे यांना पराभव पत्करावा लागला. वासळई ग्रामपंचायतीत विरोधकांनी ग्रामसुधारणा मंडळाच्या माध्यमातून ११ पैकी ७ जागा जिंकल्या. बहुजन विकास आघाडीला सहा जागा जिंकता आल्या. सरपंचपदी मंडळाच्या जसिंता कोलासो निवडून आल्या.कांँग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीमुळे तरखड ग्रामपंचायत निवडणुकीकडे सगळ््यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव बिपीन कुटीन्हो यांनी जनआंदोलन समिती आणि शिवसेनेशी युती करून उमेदवार मैदानात उतरवले होते.तर काँग्रेसचेही अधिकृत उमेदवार मैदानात होते. असे असतानाही कुटीन्हो यांच्या आघाडीने ९ पैकी ७ सात जागा जिंकून सरपंचपदी सचिन किणी यांनाही निवडून आणले. तर बहुजन विकास आघाडीला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.विरोधक यशस्वीआपल्या मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकांकडे ठाकूर स्वत: जातीने लक्ष ठेवून होते. त्यांनी प्रचारातही भाग घेतला. मतदानाच्या दिवशी या परिसरात ते ठाण मांडून बसले होते. बहुजन विकास आघाडीनेही या भागावर लक्ष केंद्रीत केले होते. दुसरीकडे, विरोधकांकडे कोणतेही नेतृत्व नव्हते. उलट तरखडसारख्या ठिकाणी बंडाळी झाली होती. असे असतांनाही विरोधकांनी पाच पैकी चार सरपंच निवडून आणून ठाकूरांना धक्का देण्याचे काम केले.
वसई तालुक्यात हितेंद्र ठाकूरांना धक्का, पाच ग्रामपंचायती बविआ विरोधकांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:04 AM