वाडा : कोरोनाच्या काळात वीज वितरणच्या कर्मचा-यांनीही वीजमीटरचे रीडिंग न घेतल्याने लॉकडाऊननंतर महावितरणकडून भरमसाट वाढीची बिले देण्यात आली आहेत. ही बिले गोरगरिबांच्या आवाक्याबाहेरची असल्याने वाढीव वीजबिले रद्द करावीत, या मागणीसाठी भाजप वाडा शाखेच्या वतीने सोमवारी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करून बिलांची होळी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मार्च ते जूनदरम्यान देशभरात लॉकडाऊन होते. सर्व काही बंद होते. या काळात वीजबिलांचे रीडिंग घेतलेले नाही. परिणामी, जुलै-ऑगस्ट महिन्यांंत गोरगरीब आदिवासी बांधवांना एकाच वेळी वाढीव बिले आली. आधीच रोजगार नसल्याने उपासमारीचे संकट असलेल्यांवर वाढीव वीजबिलांचा भार आला. याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने भाजपच्या वतीने निदर्शने करून वीजबिलांची होळी केली.वीजबिले सरकारने कमी केली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. या आंदोलनात भाजपचे तालुका सरचिटणीस राजू रिकामे, जिल्हा नेते मनीष देहेरकर, राजू दळवी, कुणाल साळवी, शुभांगी उत्तेकर, महिला तालुकाध्यक्ष अंकिता दुबेले यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.