अनिरुद्ध पाटील / डहाणूघोलवड ग्रामपंचायतीने गावातील मुख्य रस्त्यालगत दिशादर्शक फलक लावून विविध स्थळांची माहिती दिली आहे. मात्र महत्वाच्या अनेक ठिकाणांना बगल देऊन, या यादीत एका हॉटेलचा समावेश केल्याने नवा वाद उफाळला आहे. ग्रामपंचायतीने हॉटेलचे आर्थिक हितसंबंध जपले असून या प्रकरणी चौकशीची करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भारतातील चिकू फळाची जननी म्हणून घोलवडची ख्याती राष्ट्रीयस्तरावर आहे. यावर्षी चिकूला डहाणू घोलवड चिकू हे भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याने ही ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. पश्चिम रेल्वेचे महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील खऱ्याअर्थी शेवटचे रेल्वे स्थानक आणि समुद्र पर्यटन स्थळ या बाबी घोलवड गावाबाबत महत्वाच्या आहेत. मुंबई-गुजरात या प्रमुख शहरांना जोडणारा सागरी प्रमुख राज्य मार्ग गावातून जात असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते.या मार्गालगत गावातील प्रमुख स्थळांची माहिती देणारा दिशादर्शक फलक घोलवड ग्रामपंचायतीने लावला आहे. मात्र घोलवड रेल्वे स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस ठाणे, पेट्रोल पंप आदि महत्वाच्या ठिकाणांचा उल्लेख करणे परगावतील नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त तसेच क्रमप्राप्त आहे. परंतु ग्रामपंचायतीने त्याला बगल देत एका हॉटेलचा उल्लेख करून जाहिरातबाजी केल्याने या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने हॉटेलचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा उल्लेख केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा दौरा सोमवार आणि मंगळवारी बोर्डी परिसरात आहे. यावेळी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे घोलवड गावातील नागरिकांनी लोकमतला सांगितले.
महत्वाच्या स्थळांत हॉटेल?
By admin | Published: December 23, 2016 2:46 AM