नालासोपारा (मंगेश कराळे) - घरफोडी करणाऱ्या सराईत पती व त्याच्या पत्नीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश आले. सराईत पती पत्नी हे जोडीने वापीवरून ट्रेनने पालघरला यायचे व नंतर दुसरी ट्रेन पकडून विरारला येऊन घरफोडी करून परत वापीला ट्रेनने पळून जायचे. सराईत पतीवर १० ते १२ घरफोडीचे गुन्हे यापूर्वी पोलीस ठाण्यात दाखल आहे. संतोष जाटप असे आरोपी पतीचे नाव असून गीता त्याच्या पत्नीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी पती पत्नीला पालघरमध्ये सतत तीन दिवस पाळत ठेवून आरोपींना पकडले आहे. आरोपींना पुढील तपास व चौकशीसाठी विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विरारच्या जीवदानी नगर येथील परमार्थ बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या बाजीराव बंडोपंत कांबळे (३३) यांच्या घरी १४ जुलैला रात्री चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करत सोन्याचा नेकलेस, कानातील साखळ्या, कर्णफुले, सोन्याचे लॉकेट असा १ लाख २ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. १६ जुलैला विरार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपीकडे चौकशी केल्यावर अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.