पालघर : पालघरच्या पिडको औदोगिक वसाहतीमधील निशांत आरोमाज या कंपनीला शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास लागलेली आग बंबांनी आटोक्यात आणली असली तरी शनिवारी दुपारपर्यत आग धुमसतच होती. कंपनीचा फक्त सांगाडाच शिल्लक राहिला आहे. शुक्रवारी म्हणजे सुटी असताना कंपनीत आग लागली कशी? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. परफ्युम बनवितांना अतिज्वलनशील २० ते २२ प्रकारच्या रसायनांवर प्रक्रिया केली जाते. शुक्रवारी सुटीचा वार असल्याने कारखाना बंद असल्याने आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध लागला नव्हता. उशीरापर्यंत पोलीस पंचनामाचे सुरू होते. पोलीस उपअधीक्षक बी. यशोद आणि सहा.पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे कर्मचाऱ्यांसह धुमसत्या आगीवर लक्ष ठेवून होते. या आगीमध्ये निशांत आरोमाज कंपनीमधील सर्व रसायने, मशिनरी सर्व साहित्य बेचिराख झाले. तर डिलक्स रिसायकल प्लॅस्टिक कंपनी व ट्रान्सफार्मर निर्माण करणाऱ्या या कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे.औद्योगिक वसाहतीच्या ठराविक क्षेत्रात निवासी वसाहती असू नयेत हा नियम धाब्यावर बसवून लोकप्रतिनिधी, अधिकारी व बिल्डरांच्या युतीने या परिसरात रहिवासी संकुले उभी केली असून शासकीय जागांवर झोपडपट्याही उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रसंगी अग्नीशमनाला अडथळाही निर्माण होऊ शकतो. (प्रतिनिधी)
सुटीत आग लागलीच कशी?
By admin | Published: June 06, 2016 1:17 AM