पंकज राऊतबोईसर : येथील केशव नगर ते साईबाबानगर या पट्ट्यातील सुमारे दीडशे इमारतींपैकी काही इमारतींच्या कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या झाल्या आहेत. तर काही कोरड्या होण्याच्या मार्गावर असून काही भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.ग्रामपंचायतीकडून केवळ प्यायला पुरेल एवढाच पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याअभावी कोरोनाशी दोन हात करायचे कसे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा आहे. वाढत्या उकाड्याच्या काळात केशव नगर, खोदाराम बाग, मंगलमूर्ती नगर, साईबाबा नगर, परमाणू नगर, दीजयनगर, नाईक नगर, अवधूत नगर येथे भेडसावणाऱ्या पाणी समस्येमुळे येथील काही इमारतींमधील रहिवाशांना पाण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.बोईसर ग्रामपंचायतीकडून प्रत्येक विभागात केवळ दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात वीजपुरववठा खंडित झाला किंवा दाब कमी झाला तर पुरवठ्याची पूर्ण साखळी तुटून पुढील संपूर्ण भागाचा पुरवठा विस्कळीत होतो. यामुळे एमआयडीसीने बोईसर ग्रामपंचायतीचा पुरवठा वाढण्याची आवश्यकता असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.येथील लोकसंख्या दीड लाखांच्या घरात असून येथील बहुसंख्य नागरिक हे तारापूर एमआयडीसीत काम करतात. त्याच एमआयडीसीकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत हतबल आहे. परंतु आंघोळ, कपडे, शौचालयाबरोबरच वेळोवेळी हात स्वच्छ धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी उपलब्ध होत नाही. हे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न उपस्थित होत असून टँकरच्या अशुद्ध पाण्यामुळे रोगराईची भीती व्यक्त होत आहे. वसई-विरार मनपा क्षेत्रानंतर सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पालघर तालुक्यात आहेत.>एमआयडीसीकडून येणाºया पाण्याचा पुरवठा प्रत्येक भागातील नागरी वस्तीमध्ये पिण्यासाठी करण्यात येतो. परंतु, काही भागातील बिल्डिंग एरियामधील भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तेथे इतर वापरासाठी टंचाई आहे. तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मुबलक पाणी मिळत नाही.- कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, बोईसर ग्रामपंचायत>एमआयडीसी पुरेशा दाबाने ग्रामपंचायतींना २४ तास पाणीपुरवठा करीत आहे. मंजूर कोट्यापेक्षा जर जास्त पाणी हवे असेल तर पाणी बिलाची थकबाकी भरून ग्रामपंचायतीने कोटा वाढवून घेणे गरजेचे आहे.- राजेंद्र अनासने, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग एमआयडीसी, तारापूर
पाण्याशिवाय कोरोनाशी लढा द्यायचा कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 2:26 AM