भातसानगर : शहापूर तालुक्यात रविवारी संध्याकाळी आलेल्या वादळीवारा व गारपिटीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अजनुप व शिरोळ या गावांतील घरांवरील पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना दिले आहेत.
काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शिरोळ व अजनुप या गावांतील चार घरांचे पत्रे उडून गले आहेत, तर अन्य चौदा घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. यामध्ये शिरोळ या गावातील कैलास चौधरी यांचे ३४ हजार रुपये तर भाऊ धापटे यांचे ३८,५०० तर अजनुप गावातील हाल्या गावंडे यांचा ५७ हजार ४०० तर कैलास गोतरणे यांच्या ८६ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे, इतर १४ घरांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. यात एकूण दाेन लाख ८२ हजार २०० रुपयांचे नुकसानीचे पंचनामे तलाठी उज्ज्वला दराणे यांनी तत्काळ केले आहेत. या वर्षी निसर्गानेही मानवाकडे पाठ फिरविली असून, तिचे कोणत्या कोणत्या रूपाने दर्शन होत आहे. या वर्षी पडलेला महापूर पाऊस, त्यात अवकाळी पाऊस, सतत बदलते ढगाळ वातावरण, त्यात कोरोना महामारी आणि आता वादळीवारे आणि गारपीट यामुळे शेतकरी व नागरिकही चिंतातुर झाले आहेत. थोड्याच दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने, आगोठाची कामे आटोपण्याच्या तयारीत असतानाच, हे नुकसान म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती आहे. हे नुकसान कसे भरून काढायचे याच्या चिंतेत आता ग्रामस्थ सापडले आहेत. आधीच काेराेनामुळे सर्व ठप्प झाले असताना या आस्मानी संकटाला कसे सामाेरे जायचे हा प्रश्न सतावत आहे.
आताच घराची कामे पूर्ण केली होती. आता आमच्या घरावरील छप्पर उडून गेले आहे. त्यामुळे आम्ही आता राहायचे कुठे, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. - कैलास गोतरणे, अजनुपघरावर एकही पत्रा शिल्लक राहिला वर्षभरासाठी ठेवलेलं सर्व धान्य व इतर वस्तू यांची पार वाट लागली आहे. त्यामुळे आता आम्हाला लवकर नुकसान भरपाई मिळावी. - हाल्या गावंढा
मुरबाड : कोरोना महामारीमुळे भयभीत झालेले असतानाच रविवारी वादळी पावसाने व गारपिटीने तालुक्यातील आल्याची वाडी, मेर्दी, न्याहाडी, मोधळवाडी, कोळेवाडी, वाल्हिवरे परिसरात १५० घरांचे नुकसान झाले आहे. यामध्मध्ये १० ते १५ घरांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तहसीलदार अमाेर कदम आणि त्यांचे पथक व आमदार किसन कथाेरे यांनी परिसराची पाहणी केली.
काेराेनाच्या महामारीमुळे आधीच उत्पन्नाचे स्राेत बंद झाले असताना पीडित कुटुंबे हतबल झाली आहेत. अनेक घरांचे छप्परच उडून गेले आहेत. तर काही घरांच्या भिंती काेसळल्याने कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. गारपीट झाल्याने सर्वत्र गारांचा सडा पडलेला दिसत हाेता. या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून पीडितांना तातडीने जीवनावश्यक वस्तू आणि मोफत धान्यपुरवठा तसेच आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी दिले. दोन वर्षे कोरोना या महामारीने सर्वसामान्य जनतेचा रोजगार हिरावल्याने पोटभर अन्न मिळवणेही अवघड झाले आहे. त्यातच काल झालेल्या वादळी पावसाने व गारपिटीमुळे घरांचे छप्परही उडून गेले असल्याने आदिवासी बांधव हा संकटात सापडला आहे.