अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - डहाणू तालुक्याच्या सावटा गावातील घुंगरुपाडा येथील सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर शिरल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (20 ऑगस्ट) मध्यरात्री सव्वाच्या सुमारास घरात शिरलेल्या अजगराला वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे पूर्वेस तांडेल, ऐरीक ताडवाला यांनी पकडून वन विभागाकडे सोपवले.
रविवारी घरातील कोंबड्यांचा आवाज आल्यावर सुरेश दुबळा यांना जाग आली. त्यावेळी अजगराने एक कोंबडी फस्त केली होती. त्यानंतर प्रकार वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेला कळविण्यात आला. दोन्ही सर्पमित्रांनी 13 फूट लांब आणि 22 किलो वजनाच्या नर जातीच्या अजगराला पकडून वनविभागाच्या हवाली केले. त्याचे वय अंदाजे सहा वर्षापर्यंत असावे अशी माहिती सर्पमित्र पूर्वेश तांडेल यांनी लोकमतशी बोलताना दिली. तर घरात लहान मुलं, पत्नी होती, घर कुडाचे असून अजगर बिळात शिरला होता असे घरमालकाने सांगितले.
दरम्यान रविवारी दुपारी चरी गावात अजगराने चरायला गेलेली बकरी फस्त केली, त्याला ग्रामस्थांनी पकडू प्राणिमित्रांच्या ताब्यात दिले होते. तर 15 ऑगस्ट रोजी आशागड येथून अजगर पकडण्यात आला होता. मागील वर्षभरात तालुक्यातील वस्तीत अजगराचा वावर वाढला आहे.